विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून एनसीबी काम करीत असून फडणवीस यांचे निकटवर्तीय कार्यालयात वावरत आहेत, असा आरोप करीत अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्याआधी अमृता फडणवीस यांचे माफियाबरोबरचा फोटो ट्विटरवर टाकला होता. त्यावर मलिक यांचे गुन्हेगारी जगताशी संबंध असून त्याबाबतचे पुरावे दिवाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आणि प्रसिद्धीमाध्यमांना देणार असल्याचे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर पुन्हा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांना उत्तर दिले आहे. मलिकांच्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी आशिष शेलार यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि पलटवार केला आहे.

“दिवाळीनंतर जो बॉम्ब फडणवीस फोडणार आहेत तो फुटण्या आधीच त्या आवाजाला घाबरून त्यांनी कानावर हात कसे ठेवले आहेत हे त्यांच्या बदलेल्या आवाजावरून दिसत आहे. पण दिवाळीनंतर बॉम्ब फुटेलच. समीर वानखेडे यांना चरित्राचा प्रमाणपत्र देणे हे भाजपाचे काम नाही हे मी स्पष्ट करतो. एनसीबीने ड्रग्जच्या विरोधात कारवाई केलीच पाहिजे ही भाजपाची मागणी आहे. विरोधकांनी विषय भरकवटण्याचा प्रयत्न केला तरी ड्रग्ज कितीही प्रमाणात असले तरी जर तो कायद्यामध्ये गुन्हा असेल आणि ड्रग्जच्या मोजमापावर कारवाई ठरत असेल तर ती आम्हाला मान्य नाही. ड्रग्ज मिळाले तर एनसीबीने कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे. आर्यन खानला अटक झाल्यानंतर नवाब मलिक जी माहिती देत आहेत ती सर्वसाधारण माहिती आहे. ही माहिती तुमचा जावई आत असताना गुप्त का ठेवलीत? हे आरोप नवाब मलिकांनी आज सांगावे असे वाटत असल्याने आठ महिने लपवले असतील. हे आरोप आठ महिने लपवण्याचे कारण काय याचे उत्तर नवाब मलिकांनी दिले पाहिजे,” असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

“हा सगळ्या लपवाछपवीचा घटनाक्रम पाहता नवाब मलिक यांची सवयच लपवा छपवीची आहे आणि त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यातील काही आरोप गंभीर देखील आहेत. म्हणून आमची मागणी आहे की नवाब मलिक यांची आणि ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्यांची नार्को टेस्ट करावी. राज्य सरकारनेच दोघांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

“आम्ही शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीला दुष्मन मानत नाही. जे या या पुरोगामी महाराष्ट्रात गृहमंत्री म्हणून होते. त्यांना न्यायालयाने सांगितल्यानंतर सीबीआयने प्रकरण हातात घेतल्यानंतर आणि ईडीसमोर आलेल्या माहितीवर अटक करावी लागली. हा राज्याच्या प्रतिमेला तडा देणारा वेदनादायी हा प्रसंग आहे. पण भष्ट्राचाराच्या लढाईत जो गुन्हेगार असेल त्याच्यावर कडक कारवाईशिवाय पर्याय नाही. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी कितीही आव आणला तरीही पळ काढता येणार नाही. अनिल देशमुखांनी शरद पवारांचा आदर्श ठेवायला हवा होता. अनिल देशमुखांना सर्व रस्ते बंद झाल्यानंतर शरण यावे लागले,” असे आशिष शेलार म्हणाले.

“नवाब मलिक यांच्या आरोपांचा स्तर मिठी नदीतल्या खाडीतल्या खालचा आहे. त्यामुळे तो वाहणार ही नाही. त्यातून फक्त दुर्गंधी येऊ शकते. आज तुमच्याकडे तपास यंत्रणा आहे तर तुम्ही तपास का करत नाही. नवाब मलिक यांनी स्वतःचे नाव आता खयाली मलिक असं त्यांनी ठेवावे. कोणत्याही सीसीटीव्ही फुटेजला आम्ही घाबरत नाही. मुंबई पोलीस आयुक्तालयातील एनआयएकडे असलेली फुटेज बाहेर आली तर पळता भुई थोडी होईल. गैरव्यवहार करण्याचा विषय देवेंद्र फडणवीसांच्या परिवारात येतच नाही,” असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.