scorecardresearch

“जो बोलला त्याला पोलिसांकडून फोडला, हाच कार्यक्रम..”, आशिष शेलार यांनी साधला निशाणा!

लालबागचा राजा मंडळाच्या आवारात पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींशी केलेल्या धक्काबुक्कीचा आशिष शेलार यांनी निषेध केला आहे.

“जो बोलला त्याला पोलिसांकडून फोडला, हाच कार्यक्रम..”, आशिष शेलार यांनी साधला निशाणा!
भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली

मुंबईच्या लालबाग गणेश मंडळाच्या परिसरात एका पोलीस अधिकाऱ्याने पत्रकाराशी अरेरावी आणि धक्काबुक्की केल्याचं प्रकरण आता तापू लागलं आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून सत्ताधारी महाविकासआघाडी सरकारवर तीव्र शब्दांत टीका करण्यात येत आहे. याच प्रकरणात भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. या प्रकरणावरून भाजपाप्रमाणेच मनसेनं देखील सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार घडल्यामुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी विरोधकांना आयतंच कोलीत मिळाल्याचं बोललं जात आहे.

नेमकं झालं काय?

लालबाग राजा मंडळाच्या परिसरात कव्हर करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींवर ड्युटीवर असणारे पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी अरेरावी केल्याचा प्रकार आज सकाळी घडला. संजय निकम यांनी धक्काबुक्की केल्याचा देखील दावा या प्रतिनिधीने केल्यानंतर त्यावरून संजय निकम यांच्यावर आणि पर्यायाने राज्य सरकारवर टीका केली जाऊ लागली आहे. याच आधारे भाजपाकडून आमदार आशिष शेलार यांनी ट्विटरवरून निषेध नोंदवला आहे.

“दंडूकेशाही करणाऱ्या सरकारचा निषेध”

आशिष शेलार यांनी आपल्या ट्वीटमध्ये राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “लालबागच्या राजासमोर मीडियावर दंडुकेशाही करणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध! ठाकरे सरकारने देव आणि भक्तांची ताटातूट तर केलीच, पण आता ऑनलाईन भेट घडवून आणण्यासाठी धडपडणाऱ्या माध्यम प्रतिनिधींवर दंडुकेशाही देखील केली आहे. जो बोलला, त्याला पोलिसांकडून फोडला, हाच तिघाडीचा किमान समान कार्यक्रम सुरू!” असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं आहे.

 

देवेंद्र फडणवीसांचीही टीका

दरम्यान, याविषयी बोलताना राज्याचे विधानसभा विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील टीका केली आहे. “मला मिळालेल्या माहितीनुसार पासेस घेऊन नियमांचं पालन पत्रकार करत होते. अशा स्थितीत त्यांना मारहाण करणं, अशी दंडुकेशाही करणं योग्य नाही. याची दखल सरकारने घेतलीच पाहिजे, चौकशी नंतर करा, पण कारवाई आधी करा”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या