मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. यावेळी रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून महापौरांनी एका अधिकाऱ्याच्या हातातून फाईल खेचत त्यांना झापल्याचं पाहायला मिळालं. “चष्म्याचा नंबर वाढलाय का? खड्डे दिसत नाहीत?” असं म्हणत त्या अधिकार्‍यांवर संतापल्या. दरम्यान, या व्हिडिओवर अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी देखील याविषयी भाष्य केलं आहे. शेलार यांनी महापौर आणि महानगरपालिकेच्या कारभारावर तोंडसुख घेतलं आहे. “कंत्राटदारांवर कारवाई करा म्हणायचं.. पाठीमागच्या दाराने बिलं काढून कट-कमिशन खायचं..“सब गोलमाल है!”, असं ट्विट शेलार यांनी केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सब गोलमाल है!

“पालिका पोर्टल म्हणतेय खड्डे ९२७ फक्त… महापौरांची धावाधाव… ४२,००० खड्ड्यांचा दावा… ४८ कोटींचा निधी…शहरात रस्त्यांची चाळण… निकृष्ट दर्जाचं काम…मुंबईकर हैराण.. कंत्राटदारांवर कारवाई करा म्हणायचं.. पाठीमागच्या दाराने बिलं काढून कट-कमिशन खायचं..“सब गोलमाल है!”, असं शेलार म्हणाले. त्याचसोबत, “गेल्या २४ वर्षात २१ हजार कोटी खड्ड्यात घातले..तरी मुंबईतील रस्त्यांचे “रस्ते” लागले. आता धावते दौरे करुन..कारवाईचा आरडाओरड करुन..काय सांगयताय..?” असा सवाल देखील आशिष शेलार यांनी महापौरांना उपस्थित केला आहे.

कट-कमिशन खाल्लं तर बुडबुड घागरी!

“मी कट-कमिशन खाल्लं तर बुडबुड घागरी! तेच कंत्राटदार..त्याच निविदा..तिच थूकपट्टी..कसं पटणार मुंबईकरांना..खड्ड्यांनी पितळ उघडं केलं”, असंही टोला यावेळी शेलार यांनी लगावला आहे. दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काहीच दिवसांपूर्वी मुंबईतील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी कुर्ल्यातील एका ठिकाणी खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला खूप झापलं. या प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर, ही फक्त महापौरांची स्टंटबाजी असल्याची टीका देखील झाली. “इतके दिवस हे सुचलं नाही का?, असा सूर विरोधकांकडून उमटला. भाजपाने यावरून टोलेबाजी करण्यासही सुरुवात केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish shelar targets mumbai mayor kishori pednekar gst
First published on: 30-09-2021 at 12:28 IST