भायखळय़ातील राणी बागेत काल (शुक्रवार) झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत मोठा गदारोळ झाला. वरळीतील आग दुर्घटनेतील लहान बाळाचा नायर रुग्णालयात मृत्यू झाल्याप्रकरणी चर्चा सुरू असताना शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि त्यानंतर दोन्ही पक्षाचे नगरसेवक हमरीतुमरीवर आले. या पार्श्वभूमीवर आज भाजपा नेते आशिष शेलार यांनी पत्रकारपरिषद घेत सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली. “विरोधकांचे गळे कसे दाबायचे याचे बंगाली हिंसेचे धडे तुम्ही घेताय का?” असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला. या पत्रकारपरिषदेत भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची देखील उपस्थिती होती.

पालिका महासभेत गोंधळ ; शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांमध्ये वाद

शिवेसेनेवर निशाणा साधताना आशिष शेलार म्हणाले, ”हा सगळा प्रकार एवढं डोकं फिरवणार आहे, दुर्घटना घडल्यानंतर जेव्हा रूग्णांना नायरमध्ये नेण्यात आलं. तिथे ४५ मिनिटांमध्ये जास्त वेळ ना डॉक्टर, ना नर्स, देखरेख, औषधोपचार ना काळजी आणि दुर्लक्ष एवढं की चार महिन्यांचं बाळ देखील दुर्दैवाने मृत्यूमुखी पडलं. या सगळ्याबाबत जे जनतेच्याच मनात आहे, नागरिकांच्याच मनात आहे की काय सुरू आहे? काय प्रकार आहे हा? दुर्घटनेनंतर जर रूग्ण महापालिकेच्या रुग्णालयात जातो तर तो देखील संरक्षित नाही, त्यालाही औषधोपचार वेळेत होणारन नाही. यासाठी मी भाजपाच्या महापालिकेतील गटाचं अभिनंदन करेन, आमचे सर्व सदस्य नायर रूग्णालयात पोहचले आणि चौकशी केली. त्यानंतर ज्या गोष्टी समोर आल्या त्या धक्कादायक आहेत. ७२ तास झाले तरी महापौर तिथे पोहचल्या नव्हत्या, स्थायी समिती अध्यक्ष पोहचले नाहीत. सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष देखील पोहचले नाहीत.तर, युवराजांचं हॅलिकॉप्टर तर सध्या जमिनीवरच येत नाही.” असं म्हणत मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील टोला लगावला.

तसेच, ”या सर्वांच्या निषेधार्थ आमच्या सर्व सदस्यांनी राजीनामा देत काल मनपा सभागृहात प्रश्न उपस्थित केले तर काय चुकलं? मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवेसाठी वर्षाला साडेचार हजार कोटी खर्च केले जातात म्हणजे पाच वर्षात तब्बल २२ हजार ५०० कोटी खर्च करुनही मुंबईकरांची ही अवस्था असेल तर आम्ही प्रश्न विचारायचे नाही? आम्ही बोलायचे नाही? हिशेब मागायचा नाही? प्रश्न विचारलं तर गैर काय? याच परिसरात असलेल्या राणीच्या बागेतील पेंग्विनवर दिवसाला दीड लाख रुपये खर्च होतात. वर्षाला या पेंग्विनवर १५-१६ कोटी रुपये खर्च कराल. पण बाळाला वाचवण्यासाठी ४५ मिनिटात पोहोचणार नाही, हा प्रश्न विचारला तर झोंबतो! भाजपा जनतेचे प्रश्न विचारत राहणार.. त्यावर तुम्ही भाजपाच्या नगरसेवकांशी झोंबाझोंबी करणार? काल जो काही प्रकार मनपामध्ये झाला, ही झोंबाझोंबी हलकल्लोळ हा जनेतसाठी झाला असता तर आम्ही सहनही केलं असतं.” असंही यावेली शेलार यांनी बोलून दाखवलं.

हा काय प्रकार आहे? या राज्यात नेमकं चाललं काय? –

याचबरोबर ” माणसांचे मृत्यू होत असताना देखील लुटमारीचा धंदा शिवसेनेने काही सोडला नाही. म्हणून या लुटमारीसाठी काल हाणामारी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. हाणामारी करण्याचा प्रयत्न देखील, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी त्याची पायाभरणी सभागृहातच केली आहे. सभागृहामध्ये हाडतूड पासून गळा दाबून टाकेन…हे सगळं ऑनरेकॉर्ड आहे. गळे चिरणे, गळे दाबण्यापर्यंत सभागृहात चर्चा करायची. म्हणून, मुद्दाम मी आज पुन्हा एकदा सांगतो, ममता बॅनर्जी ज्या परवा येऊन गेल्या होत्या, त्यावेळी मी हाच प्रश्न उपस्थित केला होता, या गुप्त बैठका का होत आहेत? राजशिष्टाचार मंत्र्यांसोबत आणि त्यावेळी तीन प्रश्न मी उपस्थित केले त्यामध्ये हे म्हटलं होतं, विरोधकांचे गळे कसे दाबायचे याचे बंगाली हिंसेचे धडे तुम्ही घेत आहात का? आणि आज त्याचा प्रत्यय आला. गळे दाबून टाकेन इथपर्यंतच्या धमक्या सभागृहातील भाषणात स्थायी समितीचे अध्यक्ष देतात आण ते कमी पडतं की काय आमच्या नगरसेवकांनी जाब विचारल्यावर हाणामारी करण्यासाठी भायखाळामधील गुंडं काल स्थायी समिती अध्यक्षांनी सभागृहाबाहेर आणून उभा केले. हा काय प्रकार आहे? या राज्यात नेमकं चाललं काय? ” असा सवालही यावेळी आशिष शेलार यांनी उपस्थित केला.