नांदेड लोकसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विजयी झाले असले तरी ‘पेडन्यूज’ प्रकरणी पुढील आठवडय़ात निवडणूक आयोगाकडे सुनावणी होणार असल्याने त्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम राहणार आहे.
गेल्याच आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयाने अशोक चव्हाण यांच्या विरोधातील ‘पेडन्यूज’ प्रकरण ४५ दिवसांमध्ये निकालात काढावे, असा आदेश दिला होता. त्यानुसार २३ तारखेला आपली बाजू मांडण्याची नोटीस आयोगाने बजाविली आहे. २००९च्या निवडणुकीतील निकालाला देण्यात आलेल्या आव्हानावरून २०१४च्या निकालावर परिणाम होऊ शकतो का, याबाबत कायदेतज्ज्ञांमध्ये दुमत आहे. त्यातच निवडणूक आयागाने अपात्रतेची कारवाई केल्यास चव्हाण त्याला न्यायालयात आव्हान देऊ शकतात. यात काही काळ जाऊ शकतो. ‘आदर्श’ घोटाळ्यातही चव्हाण यांची डोकेदुखी  कायम आहे. त्यातच सत्तेत आल्यावर ‘आदर्श’ प्रकरणाचा तडा लावू, असे मोदी यांनी नांदेडच्या सभेतच जाहीर केले होते.