गैरप्रकाराबद्दल न्यायालये किंवा चौकशी आयोगाने ठपका ठेवलेले अशोक चव्हाण हे चौथे माजी मुख्यमंत्री ठरले आहेत. ‘आदर्श’ अहवालात चार माजी मुख्यमंत्र्यांवर ठपका ठेवण्यात आला असला तरी यापैकी चव्हाण यांच्यावरील ठपका हा गंभीर स्वरूपाचा आहे.
सुशीलकुमार शिंदे व विलासराव देशमुख यांच्या कृतीबद्दल आक्षेप घेण्यात आला असला तरी या दोघांनीही परवानग्या देण्याच्या बदल्यात कोणत्याही सवलती घेतल्याचे सिद्ध होऊ शकले नाही. निलंगेकर-पाटील यांच्या कृतीमुळे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अशोक चव्हाण यांच्या विरोधात मात्र मदत करण्याच्या बदल्यात फायदा उकळण्याचा स्पष्ट ठपका ठेवण्यात आला आहे.
आतापर्यंत बॅ. ए. आर. अंतुले, शिवाजीराव निलंगेकर-पाटील, मनोहर जोशी या तीन माजी मुख्यमंत्र्यांवर विविध न्यायालयांनी ताशेरे ओढले आहेत. अशोक चव्हाण यांच्या विरोधात चौकशी आयोगाने ठपका ठेवला आहे. सिमेंटच्या बदल्यात प्रतिभा प्रतिष्ठानला मदत घेतल्याचा आक्षेप अंतुले यांच्याविरोधात नोंदविण्यात आला होता. अंतुले यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. अंतुले आणि अशोक चव्हाण या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात परवानगी देण्याच्या बदल्यात फायदा उकळल्याचे (क्विड प्रो क्यू) आरोप झाले होते.
निलंगेकर यांच्यावर दुसऱ्यांदा ठपका
मुलीचे गुण वाढविल्या प्रकरणी उच्च न्यायालयाने तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर-पाटील यांच्यावर ताशेरे ओढले होते. तेव्हा त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मुख्यमंत्रिपद भूषविल्यानंतरही २००३ मध्ये त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. महसूल खाते भूषविताना ‘आदर्श’ला झुकते माप दिल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला.
जोशी सरांवरही ताशेरे
जावयासाठी पुण्यात शाळेसाठी राखीव असलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलल्याबद्दल शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यावर सवरेच न्यायालयातही ताशेरे ओढण्यात आले. हे प्रकरण गाजत असतानाच त्यांच्याकडून राजीनामा घेण्यात आला होता.