मुंबई: भोंदूबाबा अशोक खरात याने मंत्र- तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी कोणत्या शासकीय अधिकाऱ्याचा समावेश आहे का, याचा तपास करण्यात येत आहे. तसेच खरातला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे मदत करणारा कोणीही असला तरी त्याला धडा शिकवणारच अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका निवदेनाद्वारे भोंदूबाबा अशोक खरात यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती सभागृहास दिली. खरात सोबत अनेक राजकारण्यांचे छायाचित्र असले तरी केवळ छायाचित्र आहे म्हणून कोणाची चौकशी वा कारवाई होणार नाही. मात्र खरात प्रकरणासंदर्भात ज्या ज्या व्यक्तीच्या विरोधात पुरवा मिळेल, त्याचा कोणा कोणासोबत संपर्क, व्यवहार होता, त्याला कोण मदत करीत होते याची संपूर्ण चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली.

खरात याने नाशिक जिह्यातील वावी पोलिस ठाण्यात दिनेश परब यांंने आपले एका महिलेसोबतचे फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार दिली होती. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास केला मात्र खरात याच्या तक्रारीत काहीच तत्थ्य नसल्याचे आढळून आले. याच दरम्यान शिर्डी येथील एका महिलेने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी निरज जाधव यांने अश्लिल फोटो प्रसारीत करण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलीसांनी अशोक जाधवचा शोध सुरु केला असतानाच अशोक खरातशी सबंधित योगेश भालेराव याने अशोक खरातने भोंदूगिरी व जादूटोना मंत तंत्र वापरुन आठ महिलांवर अत्याचार केल्याचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांना दाखवले. पोलिसांनी योगेश भालेरावला संरक्षणाची हमी देत तसेच विश्वात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यातून भोंदूबाबा खराचे प्रताप उघडकीस आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन अधिक चौकशीसाठी विशेष तपास पथक(एसआयटी) गठीत करण्यात आले असून या पथकाने खरात याच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या महिलांची ओखळ पटवून त्यांचा जबाब नोंदविला आहे. आतापर्यंत पाच पिडित महिलांच्या जबाबावरुन विविध पोलिस ठाण्यात पाच तर साक्षीदाराच्या जबाबावरुन एक असे खरात याच्य विरोधात सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात कोणत्या शासकीय अधिकाऱ्याचा समावेश आहे काय याचीही चौकशी केली जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. त्याचप्रमाणे खरात याच्या शिवनिका संस्थान मधील कार्यकारी संचालक मंडळाची तसेच खरात अन्य ट्रस्टवरवर असल्यास त्यांचीही चौकशी केली जाईल. तसेच खरात सोबत संगनमत करुन कोणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आर्थिक गैरव्यवहार केले जाहेत का याचीही चौकशी केली जाणार असल्याचे फडणीस यानी सांगितले.

खरातकडे कोट्यावधींची माया

भोंदूबाबा अशोक खरातकडे कोटयवधी रुपयांच्या मालमत्ता आढळून आली आहे. सिन्नर चालुक्यात मिरगाव येथे ३३ एकर जमीन, फार्महाऊस, पाथर्डीत १० एकर जमीन, शिर्डी विमानतळाजवळ पाच एकर जमीन, तसेच नाशिक, पनवेल, पुणे येथे बंगले, फ्लॅट, ३२ तोळे सोने अशी मालमत्ता ताब्यात घेण्यात आली असून अधिक मालमत्तेचा शोध सुरू आहे. तसेच त्याने अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, यूएई, केनिया, मलेशिया आदी देशांचा दौरा केला असून त्याची अन्य कोठे मालमत्ता आहे तसे्च त्याने कर चुकवेगिरी केली आहे का याचाही तपास सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांची फसवणूक

अशोक खरात याने स्वतःकडे दैविक शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांच्या मनात विश्वास निर्माण करून त्यांना ओकस प्रॉपर्टीज, कॅनडा कॉर्नर या ऑफीसमध्ये बोलावून गुंगीकारक पदार्थ व पाणी पिण्यास देवून संमोहीत करुन किंवा त्यांचे आयुष्य बरबाद करण्याची धमकी देऊन महिलांवर अत्याचार करीत होता.

पिडितांचे फोटो समाजमाध्यमांवरून हटविणार

या प्रकरणातील ज्या पिडीत महिलांचे फोटो, व्हीडीओ फेसबुक, इन्स्टाग्राम, यु ट्युब इत्यादी समाज माध्यमा द्वारे व्हायरल झाले होते असे सर्व व्हीडीओ हटविण्याबात सायबर विभागाकडून सहयोग पोर्टलद्वारे अहवाल पाठविण्यात असून फेसबुक वरील व्हीडीओ बंद करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच

काही वृत्तवाहिन्यांनी पिडीतेची ओळख उघड होईल असे वृत्तांकन केले आहे, त्या वृत्तवाहिन्यांच्या संपादकांना कारवाईची नोटीस बजावून पिडीतेची ओळख असलेले वृत्तांकन तात्काळ बंद केल्याची माहितीही त्यांनी दिली.