मुंबई: सिन्नर एमआयडीसीच्या कार्यालयात माजी शालेय मंत्री दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांचा संबध काय? केसरकर एमआयडीसीत शाळा बांधणार होते का? केसरकर आणि चाकणकर यांचा मोबाईल काॅल रेकाॅर्ड तपासा. त्यांच्या आर्थिक स्तोत्राची तपासणी करा, या शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या आरोपांवर केसरकर यांनी सारवासारव केली. खरात याने सुंदर मंदिर बांधले आहे. अशी स्तुतीसुमने उधळत कोणी बोलविल्यावर जाणे हे कर्तव्य आहे मात्र त्याच्या कृत्यात सहभागी नाही, असे स्पष्टीकरण केसरकर यांनी दिले.
नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात यांच्या आश्रमात मंत्रीमंडळातील अनेक मंत्री व आमदारांनी हजेरी लावली असल्याचे उघडीस येत आहे. अनेक मंत्री, आमदारांचे खरात बरोबर आर्थिक संबध असल्याची चर्चा आहे.अंधारे यांनी विशेष चौकशी पथकाच्या प्रमुख तेजस्विनी सातपते यांची भेट घेतली. नाशिक एमआयडीसी कार्यालयात केसरकर यांनी घेतलेल्या बैठकीत चाकणकर व खरात होते. त्याची छायाचित्र अंधारे यांनी दाखवून एमआयडीसीत केसरकर चाकणकर यांचा संबध काय असा सवाल उपस्थित केला. केसरकर यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले.
अंधारे यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी केसरकर यांनी शिवसेना मुख्यालयात एक पत्रकार परिषद घेतली. खरात यांच्या कोणत्याही कृत्यात सहभागी नाही. महिलांच्या विरोधात चुकीचे कृत्य घडले आहे. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. असे स्पष्टीकरण देत असताना केसरकर यांनी नाशिक पोलिसांवर खापर फोडले.
खरातची कृत्य पोलिसांना माहित होती तर त्यांनी आम्हाला का सांगितले नाही. आम्हीच खरात याच्या विषयी पोलिसात तक्रार केली असती, असे केसरकर यांनी सांगितले. फोटो आणि कारवाईचा संबध नाही, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा केसरकर यांनी दाखला दिला. खरात व्यक्तीगत कसा होता हे माहित नाही. फोटो आहे म्हणून अशा प्रकरणात मंत्र्यांना ओढणे योग्य नाही, असे सांगायला केसरकर विसरले नाहीत. खरात याने बांधलेले मंदिर सुंदर आहे. त्याने बोलविल्यावर जाणे हे आमचे कर्तव्य आहे. देवाला नमस्कार करणे चुकीचे आहे का? असा उलट सवाल त्यांनी माध्यमांना केला.
