मुंबई : नाशिकचा भोंदू अशोककुमार एकनाथ खरातने महिलांच्या केलेल्या लैंगीक शोषणाच्या ३५ चित्रफिती सापडल्या असून त्याची ४० कोटींची स्थावर मालमत्ता आढळून आली आहे. याप्रकरणी ८ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तो संस्थापक असलेल्या शिवनिका संस्थानच्या संचालकांची तसेच त्याला मदत करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांनी चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
खरात प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी आज सविस्तर निवेदन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी खरातच्या अत्याचारी व अश्लील कृत्याचा पाढा वाचला. ही धक्कादायक माहिती समोर येताच सभागृह आश्चर्य आणि संतापाने स्तब्ध झाले.
अशोक खरात हा महिलांना ‘ओकस प्रॉपर्टीज’ या त्याच्या नाशिकमधील कार्यालयात बोलावून घेत असे. तिथे त्यांना मंतरलेले पाणी किंवा गुंगीकारक पदार्थ देऊन, मंत्र-तंत्राच्या नावाखाली लैंगिक शोषण करत असे. स्वतःला ‘शंकराचा अवतार’ असल्याचे सांगून महिलांना भीती दाखवली जात असे. काही महिलांना ‘लघवी’ पाजण्यासारखे अघोरी प्रकारही केले. धार्मिक विधीच्या नावाखाली एका पीडितेचा गर्भपात घडवून आणला.
खरातच्या ३५ अश्लील चित्रफिती सापडल्या असून, त्यात ८ महिलांचे शोषण केल्याचे दिसून आले आहे. भोंदूगिरीच्या मार्गाने खरातने मालमत्ता गोळा केली आहे. सिन्नर, नाशिक, शिर्डी, पनवेल आणि पुणे येथे त्याच्या कोट्यवधींच्या जमिनी, भूखंड आणि बंगले आहेत. खरातच्या मालमत्तेचे बाजारमूल्य अंदाजे ४० कोटी ८७ लाख रुपये इतके आहे. त्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, यूएई सह अनेक देशांचा प्रवास केला आहे.
त्याच्या शेतघरामध्ये एक रिवॉल्व्हर, २१ जिवंत काडतुसे आणि ६.५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. प्रकरण गंभीर असल्याने विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.आतापर्यंत ८ गुन्हे दाखल झाले आहेत. ७ गुन्हे एसआयटी कडे आहेत. पीडित महिलांची ओळख उघड होऊ नये म्हणून सायबर विभागामार्फत समाज माध्यमावरील चित्रफिती बंद करण्याची कार्यवाही सुरू आहे.
या प्रकरणात वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. खरात संस्थापक असलेल्या शिवनिका संस्थानच्या संचालकांची चौकशी करण्यात येत आहे. पोलीसांनी वेळीच ‘लुक आऊट’ नोटीस जारी केल्याने खरात परदेशात पळून जाऊ शकला नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
बिंग असे फुटले –
दिनेश परब या व्यक्तीच्या हाती राजेंद्र जासूदमार्फत खरातच्या अश्लील चित्रफिती आल्या. त्याने खरातला ५ कोटीची खंडणी मागीतली. त्यासंदर्भात खरातने नाशिक ग्रामीण पोलीसांकडे तक्रार दिली. पण, पोलिसांना काही आढळले नाही. निरज जाधव या व्यक्तीने खरातच्या अश्लील चित्रफितीव्दारे पिडीत महिलेकडे खंडणी मागितली. त्या महिलेने जाधव याची शिर्डी पोलिसांकडे तक्रार दिली. पण, पोलिसांना काही आढळले नाही. अखेर योगेश भालेराव या त्रयस्थ व्यक्तीने अशोक खरातच्या सर्व अश्लील चित्रफिती शिर्डी पोलिसांना दाखवल्या आणि त्यानंतर सदर प्रकरणाचे गांभीर्य पोलिसांना उमगले आणि प्रकरणाचे बिंग फुटले.
