मुंबई आणि गँगस्टर यांचं नातं फार जुनं आहे. गुन्हेगारी विश्वात जाऊन आलेल्या अशोक शिगवण यांनी त्या काळात काय काय घडलं होतं? ते सांगितलं आहे. मिल कामगाराचा मुलगा छोटा राजन टोळीचा गँगस्टर महेंद्र पाटीलकडे कसा गेला? मित्राबरोबर असल्याने आय़ुष्य कसं बदललं? हलाखीची परिस्थिती होती तरीही शिक्षण कसं पूर्ण केलं याबाबत भाष्य केलं आहे. अशोक शिगवण यांच्यावर १२ गुन्हे दाखल होते जे आता नाहीत. एक काळ असा होता की त्यांनी दाऊदच्या बहिणीचा बॉडी गार्ड म्हणूनही काम केलं. आता अशोक शिगवण हे नाव मनोरंजन विश्वातलं मोठं नाव आहे. त्यांनी अनेक नाटकांची निर्मिती केली आहे. महेंद्र पाटील यांची ओळख, दाऊदच्या बहिणीसाठी बॉडीगार्ड म्हणून केलेलं काम याबाबत त्यांनी भाष्य केलं आहे.
अशोक शिगवण यांनी काय सांगितलं?
मुंबई कुणाची ? मला खऱ्या अर्थाने वाटतं की मुंबई ही गिरणी कामगारांचीच आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर मुंबईत गिरणी कामगार होते. माझे वडीलही गिरणी कामगार होते. मी सातवी किंवा आठवीत असेन आणि संप झाला. न्यू ग्रेट मिल नावाची मिल होती तिथे माझे वडील काम करायचे. आमचं रेशनही मिलमधे असायचं. मिल कामागारांना मिलमध्ये रेशन मिळायचं. संपानंतर घराचं चित्र बदलून गेलं. कमवणारे माझे वडील, आई अशिक्षित आम्ही तीन भावंडं. संप झाल्याने सगळं उत्पन्न बंद झालं. गावीही आमचं काहीही नव्हतं. आम्ही काही कमवण्याइतके मोठे नव्हतो. संप झाल्यानंतर माझे वडील चोरुन मिलमध्ये काम करायला जात असत. त्या काळात अनेक कामगारांच्या हत्या झाल्या. कारण कामगार असे लपून कामाला जात असत. त्यांना कामगारांनीच मारलं. संपात सहभागी व्हावं असं त्यांना वाटत होते. इतरांच्या दृष्टीने ते चुकीचं असेल. पण बाबांनी आमचं कुटुंब चालवण्यासाठी तो निर्णय घेतला होता. माझ्या वडिलांनी रिस्क घेऊन आमच्यासाठीच काम केलं अशी आठवण अशोक शिगवण यांनी सांगितली. मित्र म्हणे या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत शिगवण यांनी ही माहिती दिली.
मी लहान होतो, आमची परिस्थिती मिल बंद झाल्यानंतर भयंकर झाली होती-शिगवण
मिलच्या मालकांनी त्यांचा स्वार्थ होता तोपर्यंत कामागरांना कामावर येऊ दिलं. नंतर मिल बंद केल्या. त्यानंतर माझे वडील घरी दारु तयार करायचे. मला ती सगळी प्रोसेस मला माहीत होती. सकाळी सहा वाजता महापालिकेचे लोक यायचे, घरातलं वातावरण विचित्र होतं. पोलीस यायचे, अनेक लोक यायचे. मी टिएनएजर होतो, त्या वयातली परिस्थिती भयंकर होती. एक दिवस वडिलांना पोलीस मारत घेऊन गेले. काय घडलं ते मला माहीत नव्हतं. माझ्या वडिलांना खूप मारलं. मी पाहिलं पण मी लहान होतो त्यामुळे काही करु शकत नव्हतो. तेव्हा काय वाटत होतं ते मी सांगूही शकत नाही, त्यावेळी काय करावं असं मला वाटलं होतं. पण त्या संघर्षातही वडिलांनी कसंबसं घर चालवलं. आईने कानातल्या कुड्या गहाण ठेवून दहावीची फी भरली होती. मी जे सांगतो आहे तशी स्थिती कमी अधिक फरकाने सगळ्यांची अशीच होती. प्रतिकूल काळातही आई वडिलांनी आम्हाला शिकवलं. पैशांची चणचण मला कॉलेजमध्ये गेल्यानंतर जास्त भासायला लागली. घरात पैसे मिळणार नव्हते कारण परिस्थितीच नव्हती.

मी मित्राबरोबर त्याच्या घरी जायचो, महेंद्र पाटीलशी तिथे ओळख झाली
मी कॉलेजला असताना माझा एक मित्र होता, मी त्याच्या बरोबर घरी जायला लागलो. त्याच्या बरोबर गेलं की त्याच्या घरातल्या गोष्टी बघून मी भारावून गेलो. त्याचा भाऊ महेंद्र हा खूप मोठा गँगस्टर होता. तिथे येणारे गँगस्टर, सोन्याची घड्याळं हे पाहून मी प्रभावित झालो. माझा मित्र हेमंत होता त्याला याच्याशी घेणंदेणं नव्हतं. पण त्याचा भाऊ गँगस्टर होता. मी तिथे सावत्या पासून, अनिल असे सगळे मोठे गँगस्टर यायचे. मला ते सगळं खूप आकर्षक वाटायला लागलं. मला वाटलं की हे आयुष्य चांगलं आहे. बाहेरुन सगळं चकचकीत वाटायचं ना.. आतली बाजू त्या वयात कळलेली नसते. हळूहळू ओळख वाढली, एक दिवस महेंद्र पाटीलला टाडा च्या अंतर्गत अटक झाली. तो नाशिकच्या तुरुंगात होता. त्याचा डबा रोज मुंबईहून नाशिकला जायचा. १० ते १२ लोक जेवतील एवढा मोठा डबा रोज जायचा असं अशोक शिगवण यांनी सांगितलं. हा डबा रोज मी घेऊन जात होतो. असं मी सलग दोन वर्षे केलं असं अशोक शिगवण यांनी सांगितलं. मित्र म्हणेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती शिगवण यांनी दिली.
दाऊदच्या बहिणीचा बॉडी गार्ड म्हणून तीन महिने काम केलं-शिगवण
महेंद्र भाई सुटून आला, दाऊदची छोटी बहीण होती मुमताज म्हणून. तेव्हा गँग वगैरे नव्हत्या, सगळे एकच होते. मला सांगण्यात आलं मुमताज बरोबर तिचा बॉडी गार्ड म्हणून राहायचं. दिवसाला तेव्हा ५०० रुपये मिळायचे. खायला प्यायला मिळणार, राहण्याची सोय होणार पैसे मिळणार. माझ्याबरोबर आणखी दोन जण होते. मुमताज जिथे शॉपिंगला वगैरे जायची किंवा कुठेही गेली तर आम्ही बरोबर जायचो. तीन महिने मी दाऊदच्या बहिणीचा बॉडीगार्ड होतो. अनेक भाई लोक यायचे. ५० आणि १०० च्या नोटांची बंडल्स असायची. पैसे मोजायचो. तिथून रेड लाइट एरिआ हाकेच्या अंतरावर होता. पोलीस रेड होणार असेल तर आम्हाला सांगितलं जायचं हे दोन-पाच हजार द्यायचे आणि आता दोन तीन दिवस दिसू नका सांगायचे. मी गावाला जायचो. मी व्यसनी कधीही नव्हतो. त्यामुळे मी गावाला जायचो. माझ्या बरोबरचे लोक रेड लाइट एरियात जायचे असं अशोक शिगवण यांनी सांगितलं. मी दाऊदला वगैरे कधी भेटलो नाही. मुमताजही बाहेर असायची. गुन्हेगारी जगतात तुम्ही प्रश्न विचारु शकत नाही. तिथे एक मशिद होती त्याजवळच आम्ही असायचो. एक संपूर्ण मजला दाऊदचा होता. मी खूपदा वरती जायचो, त्या घरात चहा प्यायलो आहे. पण दाऊदची कधी भेट झाली नाही. गुप्तता खूप बाळगली जात होती. आम्ही महेंद्र भाईने पाठवलं होतं, त्यामुळे मी छोटा राजनकडून एका अर्थाने आलो होतो. मला आई वडिलांना पैसे द्यायचे आहेत हे माझ्या डोक्यात होतं. मी गँगस्टर्स बरोबर आहे हे मला माहीत होतं. पण पुढच्या गोष्टी तेव्हा घडल्या नव्हत्या, सगळे एकत्रच होते. ती दाऊदची बहीण आहे हे पण मला नंतर कळलं असंही अशोक शिगवण यांनी सांगितलं.
