मुंबई : अशोक विजयादशमीनिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या अनुयायांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २४ विशेष रेल्वेसेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक रोड, नागपूर, अकोला आणि भुसावळदरम्यान या रेल्वेगाड्या धावणार आहेत. १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान या विशेष सेवांचे नियोजन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. या निमित्त नागपूरमधील दीक्षाभूमी येथे अभिवादनासाठी देशभरातून अनुयायी येतात. अशोक विजयादशमीच्या दिवशी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने आरक्षित व अनारक्षित विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे.

नागपूर – अकोला – नागपूरदरम्यान चार सेवा चालविण्यात येणार असून, या गाड्यांना अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा व मूर्तिजापूर येथे थांबे असतील. या गाड्यांमध्ये वातानुकूलित द्वितीय व तृतीय श्रेणी, शयनयान व सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूरदरम्यान चार अनारक्षित विशेष सेवा चालविण्यात येतील. या रेल्वेगाड्या १९ व २१ ऑक्टोबरला मुंबईहून दुपारी २.३० वाजता सुटतील. नागपूरहून २० आणि २२ ऑक्टोबरला रात्री १०.३० वाजता परतीचा प्रवास सुरू होईल. याशिवाय १८ व १९ ऑक्टोबरला याच मार्गावर आणखी दोन विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत.

पुणे – नागपूर – पुणे मार्गावर चार, सोलापूर – नागपूर – सोलापूर मार्गावर दोन, नागपूर – भुसावळ – नागपूर मार्गावर चार आणि नाशिक रोड – नागपूर – नाशिक रोड मार्गावर चार अनारक्षित विशेष सेवा चालविण्यात येतील. नाशिक रोड – नागपूर मार्गावरील विशेष गाड्या १२ डब्यांच्या मेमू स्वरूपात धावतील. नागपूरकडे जाणाऱ्या या विशेष गाड्यांना संबंधित मार्गांवरील प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई परिसरातील प्रवाशांना नागपूरला पोहोचण्यासाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहेत.

आरक्षण, तिकीट सुविधा

नागपूर – अकोला – नागपूर विशेष गाड्यांचे आरक्षण संगणकीकृत आरक्षण केंद्रे आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनारक्षित विशेष गाड्यांसाठी सामान्य दराने यूटीएस प्रणालीद्वारे तिकीट काढता येईल. तसेच रेलवन ॲपचाही वापर करता येणार आहे. गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी भारतीय रेल्वेच्या चौकशी संकेतस्थळाला किंवा एनटीईएस ॲपला भेट देण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.