मुंबई : राज्याचा आदिवासी विभागाच्या अंतर्गत असलेल्या १,०५६ आश्रमशाळांमध्ये मागच्या दोन वर्षांमध्ये तब्बल ५८४ विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला असून अनुदानित आश्रमशाळांपेक्षा सरकारी आश्रशाळांमध्ये मृत्यु अधिक झालेले आहेत. मृत्युच्या कारणांपैकी विद्यार्थ्यांचे ५ टक्के मृत्यु हे केवळ सर्पदंशाने ओढावले आहेत. शासकीय आश्रमशाळा ५०० असून त्यामध्ये २,०४,१७५ विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यांच्यावर वार्षिक २३०३ कोटी खर्च होतो. तर अनुदानित आश्रमशाळा ५५६ असून त्यामध्ये २,६१,८३६ विद्यार्थी शिकतात. त्यांच्यावर प्रतिवर्ष २०२५ कोटी रुपये खर्च केला जातो. मागच्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील आश्रम शाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थींनींचा मृत्यु झाला. या दुर्दैवी घटनेनंतर आदिवासी विभागाकडून आश्रमशाळांचा आढावा घेतला जात आहे.

गेल्या दोन वर्षात ५८४ विद्यार्थ्यांचा मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. शासकीय आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांचे ३८४ मृत्यु झाले असून ३६ विद्यार्थी शाळांच्या आवारात तर घरी असताना ३४८ विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला. अनुदानित आश्रमशाळांमधील २०० विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला असून त्यापैकी ३० विद्यार्थ्यांचा शाळांच्या आवारात तर १७० विद्यार्थ्यांचा घरी असताना मृत्यु ओढावला आहे. ११ टक्के मृत्यु हे आश्रमशाळांच्या आवारात झाले असून ८८ टक्के मृत्यु हे विद्यार्थी पालकांच्या ताब्यात म्हणजे घरी असताना झालेले आहेत.

बहुतांश अनुदानित आश्रमशाळा या राजकीय नेत्यांच्या आहेत. विद्यार्थी मृत्युची घटना घडल्यास शाळांची मान्यता रद्दची कारवाई होऊ शकते. मात्र मान्यता रद्द केल्यास शाळा संचालक न्यायालयात जातात, स्थानिक आंदोलने करतात, त्यामुळे शाळांवर कारवाई करणे विभागाला अडचणीची झाले आहे. परिणामी, विद्यार्थी मृत्युच्या घटनांची ठराविक शाळांमध्ये पुनरावृत्ती होऊ लागली आहे. शासकीय आश्रमशाळांचा सर्व खर्च राज्य सरकार करते. तर अनुदानित शाळांना प्रति विद्यार्थी प्रतीमाह २२०० परिपोषण अनुदान, आकस्मिक खर्च आणि इमारत भाडे दिले जाते. आश्रमशाळांतील प्रत्येक विद्यार्थ्यांवर शासनाचा वार्षिक सरासरी एक लाख रुपये खर्च होत असूनही या शाळा मृत्युचे कोंडवाडे झाले आहेत.

कलिंगा प्रारूप प्रमाणे विकास:

आश्रमशाळांमधील विद्यार्थी मृत्युचा प्रश्न गेली २५ वर्षे कायम आहे. विद्यार्थी मृत्युचा विषय हा केवळ आश्रमशाळांच्या इमारती आणि सोईसविधापुरता नसून तो सामाजिक- आर्थिक प्रश्न आहे. त्यामुळे ओडिशा राज्यातील कलिंगा प्रारुपप्रमाणे आश्रमशाळांचा समूह विकास करण्याचा आदिवासी विभागामध्ये विचार सुरु आहे.

आश्रमशाळा विद्यार्थी मृत्यु वर्गीकरण –

कारणशासकीयअनुदानितएकुणटक्के
१ . गंभीर आजार१८२९१२७३४७
२ . अपघात१५५७३२२८३९
३. गळफास२५३०५५
४. सर्पदंश२२०६२८

सर्व शाळांचे ऑडिट होणार :

पावसाळ्यात सर्पदंशाच्या प्रमाणात वाढ होते. त्यासंदर्भातील उपाययोजनेच्या सूचना शाळांना दिल्या आहेत. सर्व आश्रमशाळांचे परिक्षण करण्यात येत असून विद्यार्थी सुरक्षेबाबत सुनिश्चित कार्यपद्धती बनवली जात आहे.– विजय वाघमारे, सचिव, आदिवासी विभाग