व्हिवा लाउंजमध्ये अश्विनी भावे यांच्याशी संवाद साधण्याची संधी

वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री अश्विनी भावे ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’च्या पुढच्या पर्वात प्रेक्षकांशी संवाद साधणार आहे. मराठी चित्रपटसृष्टी गाजवून हिंदी चित्रपटसृष्टीत गेलेल्या आणि तिथेही सशक्त अभिनयामुळे गाजलेल्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये अश्विनी भावे यांचे नाव आवर्जून घेतले जाते. कौटुंबिक, राजकीय, विनोदी अशा सर्व प्रकारच्या चित्रपटांमध्ये अश्विनी यांच्या भूमिका गाजल्या. ‘वजीर’, ‘कदाचित’, ‘सरकारनामा’ अशा चित्रपटांतून दिसलेली संवेदनशील अभिनेत्री आजही लक्षात राहते तसा ‘अशी ही बनवाबनवी’मधला विनोद आजच्या तरुण पिढीलादेखील रिझवतो. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पणातच त्यांना आर. के. बॅनरचा ‘हीना’सारखा चित्रपट करायला मिळाला.

कुटुंबासमवेत अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर चित्रपटसृष्टीत पुनरागमन करताना त्यांनी ‘कदाचित’सारखा वेगळा चित्रपट दिला. अभिनयाबरोबर निर्माती म्हणूनही त्यांनी वेगळी वाट चोखाळली. त्यानंतर आलेल्या ‘आजचा दिवस माझा’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ध्यानीमनी’मधील अश्विनी भावे यांचा सशक्त अभिनय वाखाणला जातोय.

अमेरिकेत चित्रपटनिर्मितीविषयी अभ्यास केल्यानंतर त्यांनी तेथेही काम केले आहे. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी केसरी प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’च्या निमित्ताने मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश मिळेल.

  • कुठे – स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.)
  • केव्हा – शुक्रवार २४ फेब्रुवारी
  • वेळ – सायंकाळी ५ वाजता.