मुंबई : मुंबई स्वच्छ दिसावी यासाठी संबंधित प्रशासकीय विभागांच्या सहायक आयुक्तांनी नियमितपणे क्षेत्र भेटी द्याव्यात, तसेच स्वच्छता नीट होते की नाही हे पाहण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष (वॉर रुम) स्थापन करावा, असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले. भिडे यांनी गुरुवारी घनकचरा विभागाची आढावा बैठक घेतली.
आश्विनी भिडे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यांनी गुरुवारी घनकचरा विभागाच्या कामाचा आढावा घेतला. तेव्हा त्यांनी वरील निर्देश दिले. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विविध प्रकल्प, उपक्रम आणि कामकाजाचा आढावा महानगरपालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी उप आयुक्त प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांना आवाहन
महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे पुढे म्हणाल्या, स्वच्छता ही नियमित प्रक्रिया आहे. ती नियमितपणे तितक्याच प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. मुंबईतील सागरी किनारी रस्ता, महामार्गांवर सूक्ष्म पद्धतीने स्वच्छता व्हायला हवी. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे, या ठिकाणी यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र वाहने हवीत. या मार्गांवर स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या विविध बाबी अंतर्भूत असणारी विशेष वाहने तयार करण्यासाठी उत्तम संस्थांची मदत घ्यावी.
काही वर्दळीची ठिकाणे स्वच्छतेच्या दृष्टीने उत्तम बनवावीत आणि मग तिथे तशीच स्वच्छता कायम राहील, यासाठी नागरिकांना जागरुक करावे, असेही त्यांनी सांगितले. तसेच, स्वच्छतेप्रती नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी महानगरपालिकेकडून आयोजित ‘मुंबई क्लीन लीग’ या स्पर्धेत नागरिक तसेच आस्थापनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
स्वच्छतेसाठी कंत्राट पद्धतीचा अवलंब
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विविध प्रकल्प, उपकरण, कामकाज आदींबाबत किरण दिघावकर यांनी सविस्तर सादरीकरण केले. यावेळी ते म्हणाले की, सध्या महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतून सुमारे ७२०० मेट्रिक टन घनकचरा संकलित करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. संपूर्ण मुंबईत उत्तमप्रकारे स्वच्छता राखण्यासाठी सेवा आधारित कंत्राट पद्धती अवलंबण्यात आली आहे.
कचरा उचलण्यासाठी नवीन वाहने
घनकचरा संकलन व वहनाच्या अनुषंगाने विभागाने नवीन वाहने आणली आहेत. पूर्वी यासाठी १ हजार १९६ वाहने कार्यरत होती. पण, नव्याने आलेल्या वाहनांमध्ये क्षमतावृद्धी केल्याने आता या वाहनांची सख्या ९८८ वर आली आहे. तसेच, त्यांची रंगसंगतीही बदलण्यात आली आहे. मुंबईत ४६ ठिकाणी सुका कचरा विलगीकरण केंद्र आहेत.
तर, ९४ वाहने यासाठी पूर्णवेळ कार्यरत आहेत. घरगुती काळजीयोग्य कचरा (डोमेस्टिक सॅनिटरी वेस्ट) संकलनासाठी महानगरपालिकेकडून विशेष सेवा सुरू करण्यात आली असल्याचेही यावेळी दिघावकर यांनी सांगितले.
