मुंबई : मुंबईत ऑनलाइन खाद्यपदार्थ विक्री, गिग वर्कर्स आदी नवनवीन क्षेत्रे उदयास आली आहेत. ठिकठिकाणी डिलिव्हरी पॉईंट्स उभारले जात आहेत. त्यामुळे, विकास नियोजन करताना केवळ पारंपरिक बाबींचाच विचार न करता या नवनवीन व्यवसाय किंवा क्षेत्रांना महानगरपालिकेकडून संरचनात्मक सहाय्य देण्यासाठी सोयी-सुविधांची निर्मिती करण्याकडेही भर द्यायला हवा. मुंबईतील व्यवसायांच्या गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यावर भर द्यावा, असे आदेश महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी यंत्रणांना दिले.
विविध सोयी-सुविधांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांची सद्यस्थिती जाणून जीआयसारख्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांची स्थाननिश्चिती करावी. सुविधांसाठी आरक्षित भूखंडांबाबत समग्र धोरण तयार करावे, असेही त्यांनी नमूद केले.
महानगरपालिकेच्या सर्व विभागांची मासिक आढावा बैठक शनिवारी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. त्यावेळी भिडे बोलत होत्या. महानगरपालिकेने मुंबईत अनेक मोठे प्रकल्प, विकासकामे हाती घेतली आहेत. यामध्ये विविध प्राधिकरणाच्या यंत्रणा कार्यरत आहेत. या यंत्रणांशी योग्य समन्वय ठेवावा, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण बाबींचा आढावा घेण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्यात एका शनिवारी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असेही भिडे यांनी स्पष्ट केले.
तसेच, आढावा बैठकीत केलेल्या चर्चेनुसार संबंधित कार्यपूर्तीचा अहवालही या बैठकीत घेतला जाईल, असेही त्या म्हणाल्या. मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्ते दीर्घकालीन वापरात येण्याच्या दृष्टीने, तसेच वाहतुकीच्या अनुषंगाने आदर्श संचालनात्मक नियमावली तयार करावी. त्यात रस्त्यांच्या देखभालीसोबतच पुढील १० वर्षांमध्ये वाहतुकीत होणारे बदल, दुरुस्ती व देखभाल, उपयोगिता आणि अन्य बाबींचा समावेश करावा, अशी सूचना त्यांनी यंत्रणांना केली.
विविध समस्यांबाबत नगरसेवकांनी सभागृहात केलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. जनतेच्या समस्या आणि स्थानिक स्तरावरील वस्तुस्थिती योग्यप्रकारे समोर आणण्याचे काम लोकप्रतिनिधी करत असतात. त्यामुळे, प्रत्येक अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी सातत्याने संवाद साधून त्यांना आपल्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या नाल्यांतून गाळ काढणे, स्वच्छता किंवा अन्य संबंधित कामकाजांच्या सद्यस्थितीबाबत नियमितपणे माहिती देत राहावी. स्थानिक नगरसेवकांकडून आलेल्या सूचना, प्रतिक्रियांचे पालन होईल, यासाठी सहायक आयुक्तांनी प्रयत्न करावेत, असे निर्देशही भिडे यांनी दिले.
रस्त्यांची कामे १ जूनपूर्वी पूर्ण करावी
सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे सुमारे ७० टक्क्यांपेक्षा अधिक झाली असल्यास ती १ जूनपूर्वी पूर्ण झालीच पाहिजे. सुरू असलेली कामे दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण करून वाहतुकीसाठी सुरळीत राहतील, याची दक्षता घ्यावी. रस्त्यांवरील खड्ड्यांच्या बाबतीत सकारात्मक निष्कर्ष असून मागील तीन वर्षांत खड्ड्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. तसेच, याबाबत होणारा खर्चही सातत्याने कमी होत आहे, असेही भिडे यांनी सांगितले.
स्वच्छतेकडे एखाद्या प्रकल्पाप्रमाणे पाहू नये
घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून स्वच्छतेबाबत केल्या जाणाऱ्या विविध कार्यवाही आणि उपक्रमांचा यावेळी आढावा घेण्यात आला. यामध्ये कचऱ्यांबाबत तक्रारी, कचरा संकलन केंद्र, राडारोडा संकलन आदींबाबत चर्चा करण्यात आली. नागरी स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
स्वच्छतेकडे एखाद्या प्रकल्पाप्रमाणे पाहू नये. ही नियमित स्वरुपातील प्रक्रिया असून अधिकाऱ्यांनी यासाठी स्वयंशिस्त पाळावी. आपल्या भागातील स्वच्छतेची स्थिती जाणून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन सहायक आयुक्तांनी नियमितपणे विभागांत ठिकठिकाणी भेटी द्याव्यात, असे आदेश भिडे यांनी दिले.
एकही मनुष्य प्रवेशिका उघडी राहायला नको
पाणी साचणाऱ्या ठिकाणी महापालिकेकडून दरवर्षी उपाययोजना केल्या जातात. असे असले तरीही त्या ठिकाणी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच आराखडा तयार करावा. त्यावर, यंदा अंमलबजावणी होणे शक्य नसले तरी पुढील वर्षी येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत काम करता येईल. याबाबत कार्यपद्धती निश्चित करून त्यासाठी लागणारा कालावधी ठरवावा.
तसेच, कोणत्याही परिस्थितीत एकही मनुष्य प्रवेशिका उघडी राहणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी. पावसाळ्यापूर्वी प्रवेशिकांना जाळ्या लागायला हव्यात. दरम्यान, मुंबईत मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू असताना महानगरपालिकेच्या विविध सेवा-सुविधा वाहिन्या सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित अधिकाऱ्यांनी करून घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
