दिल्ली पोलिसांनी सोमवारी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर लाठीमार केला. हा लाठीमार म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडात जनरल डायरने ज्याप्रमाणे गोळीबार केला तसाच लाठीमार काल दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर केला. पोलिसांनी पोलिसांप्रमाणे वागलं पाहिजे, गुंडांसारखं वागू नये. शेवटी त्यांनी एक लक्षात घ्यावे की, सरतेशेवटी ते जनतेला उत्तरदायी आहेत, सरकारला नाही असं मनसे नेते संदीप देशपांडेंनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर पत्रकार परिषदेत चेंबूरच्या घटनेचा उल्लेख करत अश्विनी भिडेंचा इगो हा तर मोदींपेक्षा मोठा असल्याची टीका केली आहे. आता जर आपण हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीत तर आपल्याला पुढची पिढी षंढ म्हणेल असंही संदीप देशपांडेंनी म्हटलं आहे.
सरकारची वागणूक जनरल डायरसारखी- संदीप देशपांडे
आपल्या विद्यार्थ्याशी तुम्ही संवाद साधू शकत नाही. जालियनवाला बागमध्ये ज्या प्रकारे जनरल डायर होता तसा काल विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करणारे कायर होते. ब्रिटिश लोक गांधीजींशी बोलायला यायचे, हे बोलायला येत नाहीत. विद्यार्थ्यांना आम्ही खरोखर सलाम करतो. हुकूमशाही विरोधात आंदोलन केले, त्यांचे अभिनंदन, सगळी जनता तुमच्यासोबत आहे, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले. कोणत्याही गोष्टीची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. तसे न होणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले.
अश्विनी भिडेंचा इगो मोदींपेक्षा मोठा-संदीप देशपांडे
चेंबूरमध्ये दुर्दैवी घटना झाली, ११ वर्षांच्या विद्यार्थ्याचा झाड पडून मृत्यू झाला. तसेच एका व्यक्तीचा गटारात पडून मृत्यू झाला. या घटनांची जबाबदारी मनपाने कोणावरही दिली नाही. पालिकेच्या अहवालात या मृत्यूंसाठी कोणीही जबाबदार नाही, असे म्हटले आहे. उद्या सकाळी ११ वाजता जबाबदारी निश्चित न करणाऱ्या व्यवस्थेविरोधात मनसे आझाद मैदानावर आंदोलन करणार आहे. ११ वर्ष झाली, गार्डन डिपार्टमेंटमध्ये एकाच अधिकारी आहे. आमचं आंदोलन अधिकाऱ्याविरधात नाही, प्रशासनाविरोधात आहे. चेंबूर दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदाराला दंड केला, बाकी कोणाला जबाबदार धरलं नाही. मला तर असं वाटतं आहे की मोदींना इगो आहेच पण त्यापेक्षा जास्त इगो आयुक्त अश्विनी भिडेंना आहे. कारण आम्ही आयुक्तांना पत्र लिहिलं होतं, पण त्याचं उत्तर अजूनही आम्हाला आलेलं नाही असं म्हणत संदीप देशपांडेंनी अश्विनी भिडेंवर टीका केली आहे आणि त्यांचा इगो मोदींपेक्षा मोठा असल्याचं म्हटलं आहे.
