मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने अतिक्रमण हटवण्याच्या आदेशांची अंमलबजावणी न केल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना फटकारत नोव्हेंबरचे वेतन रोखण्याचे आदेश दिल्यानंतर अवघ्या एका दिवसात बोरिवली पूर्व परिसरातील नियोजित बेस्ट बसस्थानकाच्या जागेवरील २७ व्यावसायिक गाळे हटवण्यात आले.
बोरिवली येथील नियोजित बस स्थानक प्रकल्पाच्या जागेवरील अतिक्रमणे हटवण्याच्या आदेशांचे पालन न केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी अश्विनी भिडे यांना फटकारले. त्यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई का सुरू करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावत न्यायालयाने त्यांचे नोव्हेंबर महिन्याचे वेतन रोखण्याचे थेट आदेश दिले. याशिवाय न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या मुंबई महापालिकेला ५ लाख रुपये दंडही ठोठावला.
या पार्श्वभूमीवर बोरिवली पूर्व येथील स्वामी विवेकानंद मार्गावर ‘बेस्ट’ बस स्थानकासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम मुंबई महानगरपालिकेने बुधवारी तातडीने हाती घेतली व काही तासातच पूर्ण केली. या कारवाईत २७ व्यावसायिक गाळे निष्कासित करण्यात आले. बोरिवली पूर्व परिसरातील स्वामी विवेकानंद मार्गावरील बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट) बस स्थानकासाठी आरक्षित असलेल्या सुमारे ३ हजार ४०० चौरस मीटर भूखंडावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. महापालिकेच्या आर मध्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत अभियंत्यांसह ७० कामगार व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. दोन जेसीबी आणि चार डंपरच्या सहाय्याने अतिक्रमित व्यावसायिक गाळे निष्कासित करण्यात आले. कारवाईदरम्यान पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
बोरिवली येथील नियोजित बस स्थानक प्रकल्पाच्या जागेवरील अतिक्रमणे महापालिका प्रशासन हटवत नसल्याचा आरोप करत प्रकल्प विकासकाने सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची मंगळवारी सुनावणी झाली. अतिक्रमणे हटवण्यासाठी आणखी ३० दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी विनंती महापालिकेच्या वतीने करण्यात आली होती. मात्र खंडपीठाने ही विनंती फेटाळून लावली.
न्यायालयाने यापूर्वी वारंवार दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी अद्याप का झाली नाही, याबाबत खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच पालिका अधिकारी आणि अतिक्रमण करणाऱ्यांचे संगनमत आहे का, असा संशयही न्यायालयाने व्यक्त केला.
“सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे जाणीवपूर्वक आणि खोडसाळपणे उल्लंघन करण्यात आले असून अतिक्रमण करणाऱ्यांचे थेट समर्थन आणि संगनमत लाभल्याचे यातून दिसते,” अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कामाच्या पद्धतीत सुधारणा न केल्यास न्यायालय या सर्व बाबींचा अधिकृत आदेशात स्पष्ट उल्लेख करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
“आधी काम करा, मगच वेतन घ्या” न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी महापालिकेच्या वकिलांना सुनावताना स्पष्ट केले की, “आयुक्तांना १ डिसेंबर २०२६ पर्यंत वेतन मिळणार नाही. त्यापूर्वी आदेशांची अंमलबजावणी करा, न्यायालयात या आणि मगच आपले वेतन मिळवा.” तर मुदतवाढीची याचिका फेटाळताना सरन्यायाधीश म्हणाले, “त्यांना अगदी मध्यरात्री बसून आदेश काढू द्या. काम कसे करायचे असते, हे त्यांना समजू द्या.”
