एशियाटिक सोसायटीत बरीच वर्षं जात-येत आहे. १९७८-७९च्या आगेमागे जाऊ लागलो. १९८५ नंतर खेपा वाढल्या. याला कारण दुर्गाबाई (भागवत) आणि अशोक शहाणे. सोसायटीच्या मधल्या चौकवजा खंडात (vestibule) दुर्गाबाई बसलेल्या असायच्या. आजूबाजूला भक्कम, मजबूत कोच. समोर पीळदार, मस्क्युलर टेबल. समोरच एल्फिन्स्टनचा पुतळा. कोपर्यांत आणखी कुणाकुणाचे अर्धपुतळे. शांत, ज्ञानलीन वातावरण, निवांतपणा. गार वार्याची झुळूक अधूनमधून येरझारा घालायची. समोर हॉर्निमन सर्कल. डेरेदार झाडांचं माहेर. दुर्गाबाई हे एशियाटिकचं कुलदैवत. की ग्रीक शोकांतिकेतल्या सिंगल पर्सन कोरस (single person chorus)?
आज एशियाटिकचा जो काही लगदा होतो आहे ते पाहून दुसरी शक्यता जास्तच वाटते. एशियाटिकलाच रघू दंडवते, वीरचंद धरमसी (ह्या माणसानं आयुष्यभर निरलसपणे मूक चित्रपटांचा अभ्यास केला), दलाल स्ट्रीटला लाखोंची उलाढाल करणारे नि ग्रंथांसाठी सदा हपापलेले ऐसपैस धोतरधारी नंदू मित्तल तसंच गिरीश दमानिया, नाना जोशी, ज. द. जोगळेकर, आलू दस्तूर, विमल शाह, मीना वैशंपायन, मंगला सरदेशपांडे, विश्वास पाटील (‘नवी क्षितिजे’वाले), गुजराती नाट्य समीक्षक रमेश जमीनदार, विद्याधर दाते, जे. व्ही. नाईक, विठ्ठल नाडकर्णी! सगळे पुस्तकप्रेमी नि अवलिया.
अधूनमधून गोविंदराव तळवलकर, दि. वि. गोखले, डॉ. अरुण टिकेकर दिसायचे-बोलायचे. एकेकदा नामदेव ढसाळ यायचे. बरीच नावं आहेत. सांगायला बसलो तर मोठी यादी होईल.
एक अखंड, धगधगतं ज्ञानकुंड असं वाटायचं तेव्हाचं एशियाटिक. तिथं कोणताच विषय वर्ज्य नव्हता. अननुभवी अशा नव्या पिढीच्या मुला-मुलींचा सतत राबता. जात-पात, धर्म, जात किंवा कुचाळक्या, गॉसिप हे रिकामटेकड्या लोकांचे उद्योग तिथं चालत नसत. रात्री उशिरापर्यंत शाळा-कॉलेजातली मुलं (बहुतेक मराठी) पायर्यांवर सतरंजी टाकून अभ्यासाला बसली की संगमरवरात चिरेबंद झालेल्या एल्फिन्स्टनला बरं वाटायचं.
संध्याकाळी हॉर्निमन सर्कलची झाडं सैल होऊ लागली की एशियाटिकची दारं बंद होत. दुर्गाबाई बस पकडून घरी जात. शहाणे, धरमसी, रघू दंडवते वगैरे मंडळी जवळच्या कॉफी हाऊसात डेरा टाकत. तिथंही गप्पा नि चर्चा. पण गहनगूढ काथ्याकूट नाही. शब्द सोपे नि रसाळ. अनुभूती गहिरी.
आणीबाणीच्या काळात दुर्गाबाईंच्या अटकेचं वॉरंट घेऊन पोलीस एशियाटिकलाच हजर झाले होते. राज्यसंस्था विरुद्ध विचारस्वातंत्र्य असा एक लोकविलक्षण प्रवेश तिथं घडला. सकाळी अकरा वाजता एल्फिन्स्टन (सरकारी!) महाविद्यालयात बाईंचं भाषण झालं. बाईंनी आणीबाणीवर आसूड ओढले. तिथून त्या, शहाणे आणि इतर काही जण एशियाटिकला परत आले. दुपार झालेली. बाईंसह सगळ्यांनी आपापले डबे काढले.
तोच ‘यू आर अंडर अरेस्ट’चा कागद पोलिसांनी बाईंसमोर फडफडवला.
बाईंनी पोलीस अधिकार्याला पोळी-भाजी खाऊ घातली; त्या नि इतर सगळे रीतसर जेवले. पोलिसांच्या निळ्या डब्बा-गाडीत बाई बसून घरी गेल्या. नित्याच्या वस्तू पिशवीत भरल्या नि भायखळ्याच्या तुरुंगात दाखल झाल्या. त्या रात्री एशियाटिकच्या भिंतींना राहून राहून हुंदके फुटत होते.
त्या काळात (म्हणजे १९७५-८५) पैशाची बरीच कडकी असायची. त्यामुळे आमची सगळी मदार सार्वजनिक ग्रंथालयांवर. नि बहुतेक सगळी दक्षिण मुंबईत : गिरगावातला मुंबई मराठी साहित्य संघ; भारतीय विद्या भवन, एनसीपीए, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी, ग्रॅंट रोडची फार्बस लायब्ररी, बॉम्बे सर्वोदय मंडळ, मणि भवन, डेविड ससून, चौपाटीला महात्मा गांधी मेमोरियल लायब्ररी नि पाल्र्याची लोकमान्य सेवा संघाची लायब्ररी.
कुठंही अटकाव नाही, रोकटोक नाही. सहज प्रवेश. ग्रंथालयाचे कर्मचारी आपल्या कामात तत्पर आणि मुख्य म्हणजे ग्रंथप्रेमी. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे मनोहर पारायणे आणि लतिका जोशी, मुंबई मराठी साहित्य संघाचे ऐनापुरे, मुंबई विद्यापीठाचे मुख्य ग्रंथपाल अरविंद टिकेकर (डॉ. अरुण टिकेकरांचे भाऊ) ही काही नावं पट्दिशी आठवतात.
मुंबई मराठी साहित्य संघाचे ऐनापुरे बरेच वृद्ध होते. संग्रहालयाची वेळ संपेस्तोवर मी तिथं बसून वाचत असे. ते माझ्यासाठी थांबून असायचे. नि गिरगावातल्या मांगलवाडीतल्या नाक्यावर मला गरम दूध पाजायचे. आपणही प्यायचे. हा नेहमीचा क्रम. म्हणजे समजा की आठवड्यातून दोनदा. म्हणायचे, ‘‘अरे, शरीरात शक्ती नको का असायला? नुस्ती तल्लख बुद्धी असून भागत नाही. You look
undernourished.’’ आता तर एशियाटिकसह सगळ्याच लायब्रर्या अर्धभुकेल्या वाटताहेत.
भालचंद्र देशमुख, डॉ. अरुण टिकेकर, शरद काळे असे उत्तम अध्यक्ष मिळाल्यामुळे एशियाटिकचा कारभार बरीच वर्षं नेटानं सुरू राहिला. मी संस्थेचा साधा सदस्य नव्हतो नि नाही. त्यामुळे अंतर्गत बाबींत मला रस नव्हता. परंतु गेल्या बारा-एक वर्षांत एशियाटिकचं काही खरं नाही असं वाटू लागलं.
त्या काळातली मोठी माणसं एक तर काळाच्या पडद्याआड गेली किंवा वाढत्या वयामुळे त्यांच्या खेपा कमी झाल्या. पुरेसा सरकारी निधी मिळत नाही, पगारवाढीसाठी कामगारांत पसरलेला असंतोष वगैरे बातम्यांची जास्त चर्चा ऐकू यायची. दरम्यान, दक्षिण मुंबईच्या माझ्या फेर्यादेखील कमी होत गेल्या. ‘वर्क फ्रॉम होम’चा काळ सुरू झाला.
अधूनमधून एशियाटिकला जायचो.For old timel s sake. तिथलं सगळं वळण बदलत होतं. उत्तम इंग्रजी बोलणारे नि तत्त्वज्ञान ते एआय अशा कोणत्याही विषयांवर आपलं पुस्तकी ज्ञान फाडफाड पाजळणारे लोक मोक्याच्या जागा पटकावून बसलेत, असं माझ्या लक्षात आलं. ही चतुर मंडळी एक तर उदारमतवादी असतात किंवा डावी किंवा दोन्ही. म्हणजेच कुणीही नाही. माझ्या पिढीला दुर्गाबाई, शहाणे, वीरचंद धरमसी यांची सवय होती. त्यांना इंग्रजी येत नव्हतं की काय?
आपला बायोडाटा अधिक भारदस्त वाटावा म्हणून एशियाटिकचा उपयोग करणार्यांचा एक गट आहे. अशा मंडळींना व्यासंगी म्हणायला जीभ धजावत नाही. ज्ञानवंतानं लोकेष्णेसाठी फ्लोरा फौंटनच्या नाक्यावर वडा-पाव खावा असं कुणी म्हणत नाहीए; परंतु एकीकडे ज्ञानाचा पिसारा मिरवायचा आणि रोजचं जगणं महागडं नि डामडौलाचं हा विरोधाभास समजून येत नाही. चाळीस वर्षांपूर्वी जी माणसं एशियाटिकची धुरा वाहत होती ती व्यासंगी तर होतीच, परंतु साधं जगणारी होती.
एशियाटिक सोसायटीची निवडणूक होऊ घातली आहे. डावे नि उजवे असा सामना आहे. उजवे आले तर ते एक फार मोठं संकट ठरेल. एशियाटिक सोसायटीच्या अनमोल बौद्धिक खजिन्याचं भगवं इंटरप्रिटेशन सरसकट सुरू होईल. डाव्यांचा अंमल आला तर ते आपला अजेंडा नव्या जोमानं राबवतील नि पुन्हा फॅशनेबल हाय-फाय सोसायटीवाल्यांचा चिवचिवाट सुरू होईल.
दुर्गाबाई, काय हो असं झालं एशियाटिकचं?
ambarish.ipad@gmail.com
(अंबरीश मिश्र हे ज्येष्ठ लेखक आणि मुक्त पत्रकार आहेत.)
