मुंबई : शनिवारी होत असलेल्या एशियाटिक सोसायटीच्या बहुचर्चित निवडणुकीत १९ पदांसाठी ४५ उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि चळवळीतील कार्यकर्त्यांचा मोठा भरणा आहे. उमेदवारांप्रमाणे या निवडणुकीत प्रथमच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मतदार असणार आहेत. त्यामुळे एशियाटिकवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता आहे.

काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. केतकर नेतृत्व करत असलेल्या गटामध्ये ‘वंचित’चे नेते एडी सावंत, ‘रिपाइं’ नेते अर्जुन डांगळे, भाषा हक्क लढ्यातील कार्यकर्ते दिपक पवार, संपादक सुनिल कदम, आरबीआय संघटनेचे सीएम पॉलसिल, वारसा हक्क चळवळतील कार्यकर्ते भरत गोठोसकर, पत्रकार इब्राहीम अफगाण, सामाजिक कार्यकर्त्या कुंदा पी. एन., पत्रकार नंदिनी आत्मसिद्ध, चळवळींच्या संशोधक-लेखिका सुनंदा भोसेकर, बँकतज्ञ स्वाती दाते आणि रंगकर्मी अनिल सावंत हे १३ उमेदवार आहेत. एशियाटिकला वाचववण्यासाठी आम्हाला मत द्या, असा या गटाचा प्रचार आहे.

भाजपचे माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे अध्यक्षपदाचे दुसरे उमेदवार आहेत. सहस्त्रबुद्धे नेतृत्व करत असलेल्या गटामध्ये समरसता मंचचे संस्थापक रमेश पतंगे, माजी कुलगुरु संजय देशमुख, अभिनेता चंद्रप्रकाश व्दिवेदी, भाजपचे माजी खासदार नितीश भारव्दाज, तंत्रज्ञ विवेक गणपुले, भाजपचे माजी प्रवक्ते माधव भंडारी, प्रा. प्राची मोघे, प्रा. मल्हार कुलकर्णी, लेखक राजेश बेहरे, पत्रकार व्ही. एम. चक्रवर्ती, नाट्यकर्मी प्रमोद बापट, प्रा. माधवी नरसाळे, ज्येष्ठ पत्रकार दत्ता पंचवाघ, मुंबई भाजपचे सचिव अमोल जाधव, पत्रकार अभिजीत मुळ्ये, इतिहास अभ्यासक मल्हार गोखले, माध्यम व्यावसायीक उमंग काळे आणि इतिहास अभ्यासक स्नेहा नगरकर हे १९ उमेदवार आहेत.

सहस्त्रबुद्धे गटाचे ‘एशियाटिक टुमारो’ असे नाव आहे. राष्ट्र प्रथम, या भूमिकेतून हा गट निवडणूक लढवत आहे. एशियाटिकमधील वैचारिक अस्पृश्यता मोडून काढण्यासाठी आम्हाला निवडून द्या, अशी या गटाची हाक आहे.

या निवडणुकीत तिसरा गट असून तो अपक्ष आहे. या गटाकडे अध्यक्षपदाचा उमेदवार नाही. अरुण शंकर, नॉबी परिअरम, शर्मिष्ठा मुखर्जी, रमा बिश्नोई, आर. व्यकटेश, सविता सुरी आणि उर्वशी आस्था असे सात उमेदवार अपक्ष गटात आहेत. आदरातिथ्य उद्योग, बँकींग, विपणन, दळणवळण या क्षेत्रात कार्यरत असलेले पण इतिहास व संस्कृतीच्या अभ्यासामध्ये रुची असणारी ही मंडळी आहेत. एशियाटिकच्या कारभारात सुधारणा आणण्यासाठी आम्हाला मतदान करा, असे या गटाचे आवाहन आहे.

मतदारांमध्ये बहुतांश कार्यकर्ते :

एशियाटिकचे २३२१ जुने मतदार असून १ एप्रिलपासून १४१२ नवे सभासद नोंदले गेले आहेत. नव्या मतदारांमध्ये बहुतांश मतदार राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत. या निवडणुकीत राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एशियाटिक कुणाच्या हाती द्यायची याचा निवाडा करणार आहेत.