मुंबई : मुंबईची प्रतिष्ठित संशोधन संस्था असलेल्या ‘दि एशियाटिक सोसायटी’च्या १४ मार्च रोजी होणाऱ्या बहुचर्चित निवडणुकीत राजकीय कार्यकर्ते असलेल्या मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने या निवडणुकीच्या प्रचारात राजकीय रंग चढला आहे. २२१ वर्षे प्राच्यविद्या संशोधन क्षेत्रात कार्यरत असलेल्या एशियाटिकच्या अध्यक्षांची निवड यावेळी अल्पशिक्षीत राजकीय कार्यकर्ते करणार आहेत हे तर अधिक गंभीर !
या संस्थेच्या १९ जागांसाठी निवडणूक होत असून ४५ उमेदवार रिंगणात आहेत. भाजप, महाविकस आघाडी आणि अभ्यासक असे तीन गट निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मतदार याद्यांच्या गोेंधळामुळे ८ नोव्हेंबर रोजीची निवडणूक रद्द झाली होती. १४ मार्च रोजी होणाऱ्या मतदानाच्या मतदार याद्या शनिवारी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्या आहेत. मार्च २०२५ पूर्वीचे २३२३ मतदार असून मार्चनंतरचे १३६३ मतदार यावेळी मतदानास पात्र ठरले आहेत.
संस्थेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी गट शरद पवार , शिवसेना ठाकरे ) यांच्यात चुरस आहे . गेली सहा महिने दोन्ही बाजुंकडून सदस्यसंख्या वाढवण्यासाठी जोराचे प्रयत्न झाले होते. राजकीय कार्यालयातून अर्ज व वर्गणी भरल्याचे आरोप झाले होते. नव्या १३६३ सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असल्याची चर्चा आहे. कारण राजकीय कार्यालयांमधून सदस्यत्वाचे अर्ज भरण्यात आले आहेत.. जुने २३२३ मतदार असले तरी दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत त्यामधील केवळ १८४ सभासदांनी मतदान केले होते.
भाजप प्रणित गटाचे सर्व १९ जागांवर, महाविकास आघाडीचे १६, तिसऱ्या गटाचे १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अध्यक्षपदाची लढत काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य व नामवंत पत्रकार कुमार केतकर आणि भाजपचे माजी राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्यात होत आहे. उपाध्यक्ष पदाच्या जागा चार असून त्यासाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. या संस्थेत पॅनेल पद्धतीने निवडणूक न होता दरवर्षी रिक्त जागांची वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये निवडणूक होते.
यावेळी बहुतांश उमेदवार राजकीय व चळवळीची पार्श्वभूमीचे आहेत. ‘वंचित बहुजन आघाडी’चे ए.डी. सावंत, ‘रिपाइं’ नेते व कवी अर्जुन डांगळे, मराठी भाषा केंद्राचे दिपक पवार, ‘साप्ताहीक विवेक’चे माजी संपादक रमेश पतंगे, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु संजय देशमुख, पत्रकार इब्राहीम अफगाण, सामाजिक कार्यकर्त्या कुंदा निळकंठ, भाजप प्रवक्ते माधव भंडारी , महाभारत मालिकेत कृष्णाच्या भूमिकेतील डॉ. नितीश भारद्वाज, चाणक्याच्या भूमिकेतील डॉ. चंद्रप्रकाश व्दिवेदी अशी विविध क्षेत्रातली मंडळी या निवडणुकीत उमेदवार आहेत.
मतदार वाढणार
अनेक सभासदांचे अर्ज अपूर्ण आहेत. अर्ज त्रयस्थांनी परस्पर भरलेले दिसतात. अर्जदारांशी आम्ही संपर्क करत आहोत. मतदानाच्या दिवसापर्यंत मतदार यादीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. – प्रा. विस्पी बालापोरिया, अध्यक्ष, एशियाटिक सोसायटी.
