मुंबई : ‘दि एशियाटिक सोसायटी’च्या (मुंबई) ८ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीत २७ सप्टेंबरनंतर नोंदलेल्या सभासदांना मतदानाचा अधिकार असणार नाही, असा निवाडा धर्मादाय उपायुक्तांनी दिला. या निर्णयामुळे सुमारे १३०० नवे सभासद मतदानास अपात्र ठरले असून त्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नोंदलेल्या बहुतांश सभासदांचा समावेश आहे. या निर्णयाचा पुरोगामी अभ्यासक-कार्यकर्त्यांच्या गटाला धक्का बसला आहे.

२७ सप्टेंबर रोजी संस्थेची सर्वसाधरण वार्षिक सभा झाली. त्यामध्ये ८ नोव्हेंबर रोजी निवडणूक घेण्याचा निर्णय झाला. निवडणूक जाहीर झाल्यानंतर संस्थेतील विद्यमान सत्ताधरी गटाने मोठ्या संख्येने सभासदांची नोंदणी केली आहे, अशी तक्रार विरोधी गटाने धर्मादाय आयुक्तांकडे केली होती. त्यासदंर्भात शुक्रवारी धर्मादाय उपायुक्त राम लिप्ते यांनी सुनावणी घेवून निवाडा दिला. ३ ऑक्टोबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. तेव्हापर्यंत ज्या अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे, अशा सभासदांना ८ नोव्हेंबर रोजी मतदान करता येईल, असे धर्मादाय उपायुक्तांच्या आदेशात म्हटले आहे.

भाजपचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे आणि काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांच्यात अध्यक्षपदासाठी यावेळी लढत आहे. मार्चपर्यंत संस्थेचे ३ हजार ६३८ सभासद होते. दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने नवे सभासद केले आहेत. याची माहिती माध्यमांत येताच काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांने उडी घेत हजारपेक्षा नवे सभासद नोंदवले होते. पण, धर्मादाय उपायुक्तांच्या या निर्णयाने काँग्रेस, राष्ट्रवादीने नोंदवलेल्या सभासदांना मतदान करता येणार नाही. ८ नोव्हंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत जुने ३ हजार ६३८ आणि २७ सप्टेंबर पर्यंतचे ३५० असे ३ हजार ९८८ सभासद मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत.

मागच्या वर्षी झालेल्या निवडणुकीत अवघ्या १६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत चार गटांतील १९ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात आहेत.या संस्थेत दरवर्षी काही पदाधिकाऱ्यांची मुदत संपते आणि त्या पदासाठी निवडणुक होते. या संस्थेची निवडणूक पॅनेल पद्धतीने होत नाही. इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात दोन शतके कार्यरत असलेल्या ‘एशियाटिक सोसायटी’च्या निवडणुकीला यावेळी पक्षीय रंग आला आहे.

भाजप कार्यकर्त्यांना बळ

धर्मादाय उपायुक्तांच्या निर्णयाने भाजप कार्यकर्त्यांनी नोंदवलेले सभासद मतदानास पात्र ठरले असून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नोंदवलेले सभासद अपात्र ठरले आहेत. त्यामुळे उजव्या गटाला चांगलेच बळ मिळाले आहे. जुने सभासद मतदानास उदासीन आहेत. तर भाजप संबंधीत कार्यकर्त्यांनी नव्याने केलेले उजव्या विचारसरणीशी संबंधीत सभासद मतदानाला झाडून येणार असल्याने भाजपचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांचा अध्यक्षपदासाठीचा विजय पक्का मानला जात आहे.