मुंबई : गेली नऊ महिने रखडलेली ‘दि एशियाटिक सोसायटी’ची निवडणूक पुढच्या महिन्यात होणार असून अद्यावत मतदार संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सुधारित मतदार याद्यांमध्ये २५१० मतदार असून निवडणूक जाहीर करण्यात आलेल्या दिनांकापर्यंतचे म्हणजे २७ सप्टेंबर पर्यंतच्या अर्जदारांना या निवडणुकीत मतदान करता येणार आहे.

नवमतदारांच्या संख्येवरुन एशियाटिकची निवडणूक वादग्रस्त बनली होती. दोनवेळा निवडणूक ऐनवेळी रद्द झाली.धर्मादाय आयुक्त आणि उच्च न्यायालयात वाद गेला. २३ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाने वैध सदस्यांची उपसिमीती नेमली. त्यामध्ये हवाई वाहतूक क्षेत्रातील व्यवसायीक मंदार भारदे, साठ्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य सूरज पंडीत, टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील प्रा. सुरेंद्र कुलकर्णी आणि धर्मादाय आयुक्तांचे प्रतिनिधी के. डी. तळोकर यांचा समावेश आहे.

वर्ष २०२४ मध्ये संस्थेचे ३५५४ सभासद होते. वर्ष २०२५ मध्ये सभासद संख्या ३६३८ पर्यंत गेली. १४ मार्च २०२६ च्या निवडणुकीसाठी ३७४७ मतदार पात्र ठरले होते. मात्र सुधारीत याद्यांमध्ये अवघे २५१० मतदार आहेत. कारण, २७ सप्टेंबर पर्यंतच्या सभासदांना या मतदानासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर वार्षिक सदस्यत्व घेतलेल्या अर्जदारांचा हिरमोड झाला आहे. त्यामध्ये विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते होते.

अर्ध्यावर राहिलेली निवडणूक प्रक्रिया पुढे चालू राहणार आहे. त्यामुळे नव्याने उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. १९ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात आहेत. अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर आणि भाजपचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्यात चुरस आहे. ३ ऑक्टोबर पर्यंतच्या अर्जदारांना मतदानाचा अधिकार असावा, असे सहस्त्रबुद्धे गटाचे तर १६ ऑक्टोबर पर्यंतच्या अर्जदारांना सभासद करण्याची केतकर गटाची मागणी होती.

सुधारीत याद्यांवर १५ दिवसांच्या आत हरकती व सूचना संस्था कार्यालयात प्रत्यक्ष द्याव्यात, असे आवाहन समितीने केले आहे. संस्कृती व कलेच्या इतिहास संशोधनात दोन शतके कार्यरत असलेल्या एशियाटिकच्या निवडणुकीस प्रथमच राजकीय रंग आला आहे. ज्या अर्जदारांना यावेळी मतदानाची संधी मिळाली नाही, त्यांच्या सभासदत्वाचा निर्णय नवी छाननी समिती घेईल. धमार्दाय आयुक्त यांचे प्रतिनिधी के. डी. तळोकर या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.प्रा. विस्पी बालापोरिया दोन वर्षे संस्थेच्या अध्यक्ष होत्या.

यादीत दिवंगत मतदार :

एशियाटिकच्या आजीव सदस्यांची मोठी संख्या आहे. त्यात अनेक दिवंगत आहेत. तरी त्यांची मतदार याद्यांमध्ये नावे आहेत. परिणामी, निवडणुकीत दोनशेच्या आसपास मतदान होते. सहस्त्रबुद्धे गटाने दोन वर्षांपासून सदस्यसंख्या वाढवण्यावर लक्ष दिले होते. केतकर गटाने ऐनवेळी मोहीम उघडून सदस्य संख्या वाढवली. पण, त्यांतील बहुतांश अर्जदार २७ सप्टेंबरनंतरचे असल्याने त्यांना सुधारीत यादीत स्थान मिळू शकलेले नाही.