मुंबई : कला-संस्कृतीच्या क्षेत्रात दोन शतके कार्यरत असलेल्या एशियाटिक सोसायटीची उद्या, शनिवारी होणारी बहुचर्चित निवडणूक मतदार याद्यांमधील गोंधळामुळे धर्मादाय आयुक्तांनी ऐनवेळी स्थगित केली. संस्थेचे दैनंदिन कामकाज धर्मादाय आयुक्तांनी नेमलेले निरीक्षक आणि व्यवस्थापन मंडळातील पाच सदस्यांची उप समिती पाहणार आहे. निवडणूक स्थगित होण्याची चार महिन्यांतील दुसरी वेळ आहे. आता ही निवडणूक बहुधा जूनमध्ये होईल.
वर्ष २०२३ मध्ये निवडलेल्या व्यवस्थापन समिती सदस्यांचा बदल अहवाल (चेंज रिपोर्ट) आयुक्तांनी फेटाळला होता. त्यावरील अपिलाची सुनावणी सोमवारी झाली. त्याचे निकालपत्र मतदानाला एक दिवस असताना धर्मदाय आयुक्तांनी दिले. मंदार भारदे, विवेक गणपुले, कुमार केतकर, सुरेंद्र कुलकर्णी आणि सूरज पंडित या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची समिती व धर्मादाय आयुक्तांचे निरीक्षक के. डी. तलोकर हे संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहतील, असे त्यात म्हटले आहे.
४८ पानी निकालपत्रामध्ये वैध मतदार याद्या व त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम दिला आहे. मात्र कुमार केतकर आणि विवेक गणपुले हे उमेदवार असल्याने त्यांना मतदार याद्याचे काम करण्यास मनाई केली आहे. मंदार भारदे, सुरेंद्र कुलकर्णी, सूरज पंडित आणि निरीक्षक के. डी. तोलकर यांची उप-समिती दोन महिन्यांत मतदारांची यादी तयार करतील. त्यावरील हरकतींची १५ दिवसांत सुनावणी होईल. याद्या अंतीम झाल्यानंतर महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश निकाल पत्रात आहेत. आगामी निवडणुकीसाठी नवीन सभासद अर्ज स्वीकारण्यास मनाई केली आहे.
उद्याच्या निवडणुकीत १९ रिक्त जागांसाठी तीन गटाचे ४५ उमेदवार रिंगणात होते. भाजपचे माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांच्या १९ उमेदवारांचा ‘एशियाटीक टुमारो’ गट आणि काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांच्या गटाचे १३ उमेदवार यांच्यात चुरस होती. आर. व्यंकटेश यांच्या नेतृत्वाखाली अपक्ष गटाचे ७ उमेदवार या निवडणुकीत होते.
निर्णयाचा लाभ कुणाला ?
३१ मार्च पर्यंतचे जुने २३३८ आणि १ एप्रिलपासूनचे १४०९ नवे सभासद उद्याचे मतदार होते. नव्या सभासदांमध्ये काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी गट व ठाकरे शिवसेना या पक्षांचे बहुतांश पाठिराखे आहेत. त्यापूर्वी भाजपच्या गटाने सदस्य संख्या वाढवली आहे. नवे सदस्य बेकायदा असल्याचा सहस्त्रबुद्धे गटाचा आरोप होता. नव्या सभासदांचे सदस्यत्व वार्षिक असून ३१ मार्चला त्यांची मुदत संपते आहे. त्यामुळे त्यांना तीन हजार रुपये शुल्क भरुन पुन्हा सदस्यत्व घ्यावे लागेल. त्यानंतर समितीकडून छाननी होईल आणि त्या छाननी समितीमध्ये भाजपच्या सहस्त्रबुद्धे गटाचे बहुमत आहे. एकप्रकारे केतकर गटाची कोंडी करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
केतकर न्यायालयात दाद मागणार :
आपण उद्या एशियाटिकच्या नियोजित मतदानाला जाणार आहोत. हजारो सभासदही मतदानाला येणार आहेत. धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात आम्ही दाद मागणार आहोत, असे अध्यक्षपदाचे उमेदवार कुमार केतकर यांनी धर्मदाय आयुक्तांच्या निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितले.
