मुंबई : दक्षिण मुंबईतील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या एशियाटिक सोसायटिची शनिवारी होणारी निवडणूक धर्मादाय आयुक्तांनी मतदानाला एक दिवस असताना म्हणजे शुक्रवारी स्थगित केली. मात्र निवडणूक स्थगित झालेल्या निर्णयाची माहिती संस्थेने सर्व मतदारांपर्यंत तत्काळ पोचवली नाही. परिणामी शेकडो मतदार शनिवारी संस्थेच्या आवारात आले होते.

संस्थेच्या १९ रिक्त जागांसाठी शनिवारी दुपारी १२ ते ६ वाजेपर्यंत मतदान होते. तीन गटांनी ४५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. नोव्हेंबरमध्ये संस्थेची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. तिन्ही गटांकडून गेले अनेक आठवडे मतदारांशी मतदानाला येण्यासाठी संपर्क साधला जात होता. त्यामुळे या निवडणुकीत प्रथमच दीड हजाराच्या आसपास मतदान जाईल, असा अंदाज होता.

शुक्रवारी दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद अकोलकर आणि एशियाटिकच्या व्यवस्थापन समितीला धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून निवडणूक स्थगीत करण्यात आल्याचा आदेश प्राप्त झाला. संध्याकाळपर्यंत याविषयी संभ्रम होता. निवडणूक लढवत असलेल्या गटांनी रात्री मतदारांना व्हॉटसअपच्या माध्यमातून तसे कळवले. संस्थेनेही संकेतस्थळावर निवडणूक स्थगितीची माहिती दिली आणि मेलव्दारे सभासदांना कळवले होते.

तरी आज अनेक मतदार एशियाटिक सोसायटी मध्ये मतदानासाठी पोचले. मतदान स्थगित झाल्याचा आपल्याला मेल प्राप्त झाला नाही, अशी त्यांनी संस्थेच्या कार्यालयात तक्रार केली. अनेक मतदार कल्याण, विरार, पनवेलपासून आले होते. शनिवार असल्याने एशियाटिक मधील मध्यवर्ती ग्रंथालय बंद असल्याने इमारतीत सामसूम होती. निवडणूक स्थगित झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. मागच्या निवडणुकीत जेमतेम १८५ मतदारांनी भाग घेतला होता. यावेळच्या निवडणुकीला पक्षीय स्वरूप आल्याने मतदार वाढण्याची शक्यता होती.

मतदार हादरले :

१ एप्रिलपासून १४०९ मतदारांना एशियाटिक संस्थेकडून सदस्यत्व देण्यात आले आहे. यातील बहुंताश वार्षिक सदस्य आहेत. ही निवडणूक आता जून मध्ये होण्याची शक्यता वर्तविली जाते. पण या वार्षिक मतदारांना त्यामध्ये मतदान करता येणार नाही. मतदानासाठी पात्र होण्यासाठी त्यांना पुन्हा वार्षिक सदस्यत्व घ्यावे लागणार आहे.

वाद उच्च न्यायालयात ?

राज्य धर्मादाय आयुक्त यांच्या निवडणुकांना स्थगिती देण्याच्या निर्णयाविरोधात कुमार केतकर यांचा सेव्ह एशियाटिक गट उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे एशियाटिकची बहुचर्चित निवडणूक पुढे कोणते वळण घेते, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.