मुंबई : कला, भाषा, संस्कृती, इतिहास या क्षेत्रामध्ये संशोधनाचा दोनशे वर्षांचा वैभवी वारसा असलेल्या फोर्ट मधील द एशियाटिक सोसायटीच्या व्यवस्थापन समितीच्या पाच जागांसाठी शनिवारी मतदान पार पडले. या सर्व पाच जागा संस्थेत विद्यमान सत्ताधारी असलेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांच्या एशियाटिक टुमारो गटाने सर्व पाच जागा मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत.
व्यवस्थापन समितीच्या पाच जागांसाठी १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष असलेले भाजपचे माजी राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या ‘एशियाटिक टुमारो’ गटाचे पाच सदस्य होते. सारंग दर्शने, डॉ. नील हेळेकर, अरविंद सिंग, डॉ. माधवी नरसाळे आणि विकास परांजपे हे एशियाटिक टुमारो गटाचे पाचही सदस्य मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. भाजप पदाधिकाऱ्यांचा भरणा असलेल्या विद्यमान सत्ताधारी एशियाटिक टुमारो गटाची संस्थेवरील पकड आजच्या निवडणुकीमुळे मजबूत झाली आहे.
इतर पाच पराभूत सदस्य कोणत्याही गटाचे नव्हते, ते संस्थेचे माजी पदाधिकारी असून स्वबळावर उभे होते. त्यांना प्रत्येकी ५० च्या आतच मते मिळाली. माधवी नरसाळे या सर्वाधिक २१७ मते मिळवून विजयी झाल्या. २५७ सभासदांनी मतदानात भाग घेतला. दोन मते अवैध ठरली. संस्थेच्या पाच सदस्यांची दरवर्षी मुदत संपते. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्यांची मतदानाद्वारे निवड केली जाते. दिलीप करंबेळकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
विशेष सुरज नसलेल्या या निवडणुकीमध्ये सत्ताधारी एशियाटिक टुमारो गटाने जोरदार प्रचार केला होता. संस्थेच्या आवारात या गटाचे आज मतदान बूथ उभे होते. तेथे चहापान व इतर सोयी सुविधा होत्या. तीन महिन्यापूर्वी पार पडलेल्या संस्थेच्या निवडणुकीमध्ये ५१७ सभासदांनी मतदान केले होते. अडीच हजार पेक्षा अधिक सभासद असलेल्या संस्थेमध्ये आज अवघे २५७ मतदान होऊ शकले. काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या ‘सेव्ह एशियाटिक’ गटाने आजच्या निवडणुकीत रस न दाखवल्यामुळे ही निवडणूक एकतर्फी पार पडली. बहुतांश सभासदांनी आजच्या मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
वंदे मातरमचा वाद :
संस्थेची आज वार्षिक साधारण सभा पार पडली. यावेळच्या सभेत पहिल्यांदा संस्थेची सभा राष्ट्रगीताने सुरू झाली आणि शेवट वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने झाला. संस्थेचे विश्वस्त व काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य प्रा. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी वंदे मातरम चालू असताना सभा सोडल्याचा आरोप सहस्रबुद्धे गटातील पदाधिकाऱ्यांनी केला. वंदे मातरमची दोन कडवी झाल्यानंतर आपण सभागृहातून बाहेर पडलो. हा शासकीय कार्यक्रम नव्हता. त्यामुळे पूर्ण वंदे मातरम गीत होईपर्यंत उपस्थित असणे बंधनकारक नाही, असे मुणगेकर यांनी स्पष्ट केले.
