मुंबई : एशियाटिक सोसायटीच्या शनिवारी होऊ घातलेल्या निवडणुकीत डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्त्वाखालील ‘एशियाटिक टुमारो’ पॅनलला राज्याच्या सांस्कृतिक-सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील ३० नामवंतांनी पाठिंबा दिल्याचा दावा कऱण्यात आला आहे. मात्र पाठिंबा देणाऱ्यांमध्ये बहुतांश व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे पाठिराखे असल्याचा आरोप ‘सेव्ह एशियाटिक’ या विरोधी पॅनेलने केला आहे. यापैकी काहींनी तर पाठिंबाही दिलेला नसताना त्यांचे नाव पाठिंब्याच्या पत्रकात समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एशियाटिकला विद्यमान दूरवस्थेतून बाहेर करण्याकरिता व नवसंजीवनी मिळवून देण्याकरिता संस्थेच्या सदस्यांनी टुमारो पॅनलला मतदान करण्याचे आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. यात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, मूर्तीशास्त्रातील तज्ज्ञ गो. बा. देगलूरकर, इतिहासकार पांडुरंग बलकवडे, लेखक अमिष त्रिपाठी, साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, लेखिका मीना वैशंपायन, भन्ते राहूल बोधी, आयआयएम (मुंबई) संचालक मनोजकुमार तिवारी, डिक्कीचे संस्थापक मिलिंद कांबळे, शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसुधा कामत, आयसीटीचे कुलगुरू अनिरूद्ध पंडित, टिसचे बद्रीनारायण तिवारी, केईएमचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक, भांडारकर प्राच्य विद्या संस्थेचे विश्वस्त व माजी खासदार प्रदीप रावत, चित्रकार सुहास बहुळकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद सोमण, निरूपणकार धनश्री लेले, शिक्षणतज्ज्ञ विजय बेडेकर, दलित साहित्यिक टेक्सास गायकवाड, लेखिका अमी गणात्रा, अर्थतज्ज्ञ आशिष चौहान, क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी, विधिज्ञ एस. के. जैन, बुद्धिबळपटू रघुनंदन गोखले, वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सुनील जोशी, वैद्यकीय तज्ज्ञ प्रमोद लेले, संगीतकार भरत बलवल्ली, टेनिसपटू श्रीकांत वाड, अभिनेते मनोज जोशी यांनी पाठिंबा दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
पाठिंबा दिला नसतानाही समावेश
पाठिंबा देणाऱ्यांमध्ये ज्यांची नावे आहेत त्या बहुतांश व्यक्ती संघ, भाजपचे पाठिराखे आहेत. काही तर त्यांचे आमदार-खासदार राहिले आहेत. यापैकी काहिंनी तर पाठिंबा दिलेला नसताना त्यांच्या नावाचा समावेश पत्रात कऱण्यात आला आहे, असा आरोप सेव्ह एशियाटिकचे अध्यक्षपदासाठीचे उमेदवार कुमार केतकर यांनी केला.
