मुंबई : दोन वेळा रद्द झालेली ‘एशियाटिक सोसायटी’ची निवडणूक शनिवारी (दि.४) होत असून या निवडणुकीत डॉ. चंद्रप्रकाश व्दिवेदी, नितीश भारव्दाज, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे हे भाजपचे तीन माजी खासदार आणि काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष, माजी प्रदेश उपाध्यक्ष, माजी मुंबई शहर चिटणीस, वंचित बहुज्ना आघाडी व रिपाइं नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्राच्यविद्या संशोधनाच्या क्षेत्रात दोन दशके कार्यरत असलेल्या या संस्थेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता शिगेला पाेचली आहे.

अध्यक्ष, सचिव, ४ उपाध्यक्ष, ६ सदस्य आणि छाननी समितीचे ७ सदस्य अशा १९ जागांसाठी निवडणूक होत आहे. तीन गटाचे ४५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २५३० सभासद मतदार असून उद्या सकाळी १० ते सायंकाळी ४ वेळेत फोर्ट परिसरातील संस्थेच्या कार्यालयात मतदान होईल.

काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर हे ‘सेव्ह एशियाटिक’ गटाचे नेतृत्व करत असून भाजपचे माजी राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुद्धे ‘एशियाटिक टुमारो’ गटाचे मुख्य आहेत. या दोन माजी राज्यसभा खासदारांमध्ये अध्यपदासाठी चुरस आहे.

गेली सहा महिने मतदार याद्यांच्या मतभेदामुळे निवडणूक रखडली होती. त्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात पाच याचिका दाखल झाल्या होत्या. धर्मादाय आयुक्त यांच्याकडे डझनभर तक्रार करण्यात आल्या होत्या. अखेर धर्मादाय आयुक्तांचे प्रतिनिधी के. डी. तळोकर यांच्या देखरेखेखाली उद्या निवडणूक होत आहे. भाजपने त्यांच्या खास पद्धतीने ‘पन्ना’ प्रमुख यंत्रणा या अकादमिक संस्थेच्या निवडणुकीत जुंपली आहे.

सहस्त्रबुद्धे गट :

समरसता मंचचे सुनील पतंगे, माजी कुलगुरु संजय देशमुख, माजी खासदार चंद्रप्रकाश व्दिवेदी, माजी खासदार नितीश भारव्दाज, ‘टीआयएफआर’चे विवेक गणपुले, भाजप प्रवक्ते माधव भंडारी, ‘आयआयटी’चे मल्हार कुलकर्णी, प्रा. प्राची मोघे, राजेश बेहरे, कवी प्रमोद बापट, व्ही. एम. चक्रवर्ती, प्रा. माधवी नरसाळे, दत्ता पंचवाघ, भाजप सचिव अमोल जाधव, पत्रकार अभिजित मुळ्ये, मल्हार गोखले, उमंग काळे आणि स्नेहा नगरकर असे १९ उमेदवार आहेत.

केतकर गट :

माजी प्र कुलगुरु ए. डी. सावंत,“रिपाइं’ नेते व कवी अर्जुन डांगळे, मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार, विश्लेषक सुनील कदम, बँकतज्ञ सीएम पॉलसिल, ‘खाकी’चे भरत गोठोस्कर, लेखक इब्राहीम अफगाण, प्रा. कुंदा पी. एन., लेखिका नंदिनी आत्मसिद्ध, संशोधक सुनंदा भोसेकर, स्वाती दाते, प्रकाशक अनिल सावंत असे १३ उमेदवार आहेत. तिसऱ्या गटाचे ७ उमेदवार आहेत. केतकर आणि सहस्त्रबुद्धे गटामध्ये चुरस आहे.

या निवडणुकीसाठी ३६३८ सभासद मतदानास पात्र ठरले होते. मात्र सहस्त्रबुद्धे गटाने त्यावर आक्षेप घेतल्याने वाद मुंबई उच्च न्यायालयात पोचला होता. अखेर सप्टेबर नंतरच्या १४३० सदस्यांना यादीमधून वगळण्यात आले.

काही महिन्यांपूर्वी दादरच्या ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’च्या निवडणुकीत शरद पवार गटाचा विजय झाला तर गिरगावच्या ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’च्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनेलला पराभवाचा सामना करावा लागला.

निवडणुकीवर डोळा ठेवून हालचाली :

एशियाटिक टुमारो गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार विनय सहस्त्रबुद्धे यांनी मागच्या आठवड्यात केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेतली आणि एशियाटिकला विशेष अनुदान द्यावे, अशी मागणी केली. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी संस्थेला भेट दिली आणि विविध कामांसाठी ५ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी दिला. यावेळी भाजपचे आमदार अतुल भातखळकर सोबत होते. यासंदर्भातल्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असून निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीतील गटांनी सत्ताधाऱ्यांची मदत घेण्याबाबत नापसंती व्यक्त करण्यात येत आहे.