– डॉ. दीपक पवार

डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी ‘पहिली बाजू’ या सदरात एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकीबद्दल रंगवलेले त्यांचे कल्पनाचित्र वाचलेे. गेल्या काही महिन्यांत त्यांनी ‘एशियाटिक’च्या प्रश्नावर राळ उडवून दिली आहे. या संस्थेचे शुद्धीकरण करण्याचा विडा आपण उचलला आहे असा त्यांचा दावा आहे. त्यासाठी त्यांनी सध्याच्या कार्यकारिणीवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. स्वत: सहस्रबुद्धे एशियाटिकचे उपाध्यक्ष होते. त्या काळात त्यांनी एशियाटिकच्या विकासासाठी काय योगदान दिले, किती बैठकांना ते उपस्थित राहिले याबद्दल त्यांनी बोलले पाहिजे. इथे सगळे गहाळ होत चालले असेल तर त्याची काहीएक जबाबदारी त्यांच्यावरही येऊन पडते, हे ते सोयीस्कररीत्या विसरलेले दिसतात.डॉ. सहस्रबुद्धे हे इंडियन काऊन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्सचे दोनदा अध्यक्ष होते. राज्याच्या सांस्कृतिक धोरणाच्या पुनर्विलोकनासाठी नेमलेल्या समितीचे कार्याध्यक्ष होते आणि त्यांना मंत्रिपदाचा दर्जा होता. या काळात त्यांनी एशियाटिकच्या आर्थिक, सांस्कृतिक भरणपोषणासाठी काय पावलं उचलली? तसं असेल तर त्यांच्या दाव्यांना काहीएक आधार असेल,अन्यथा ती व्यर्थ बडबड ठरेल.

सहस्रबुद्धे यांनी त्यांच्या मातृसंस्थेच्या कुजबूज कार्यपद्धतीप्रमाणे ‘दुर्मीळ दस्तावेजांच्या देखभालीकडे संस्थेला पुरेसे लक्ष देता आले नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे’ असे विधान केले आहे. हे अनेकजण कोण? धर्मादाय आयुक्तांनी निवडणूक पुढे ढकलली याचं कौतुक करताना सहस्रबुद्धे थकत नाहीत. पण, धर्मादाय आयुक्त आणि न्यायालये किती स्वायत्त आहेत आणि त्यांचा सरकारविरोधी व्यक्ती आणि संस्था यांना नेस्तनाबूत करण्यासाठी कसा वापर होतो आहे हे रोज दिसते आहे. अशा यंत्रणेचे लाभार्थी असणार्‍यांनी तिचे कौतुक करणे हा कृतज्ञतेचा भागच मानला पाहिजे.

संस्थेने वैचारिक अस्पृश्यता पाळली असा त्यांचा आक्षेप आहे. संघपरिवाराच्या परिसंस्थेत हिंदुत्वाची भलामण करणारे जे साहित्य प्रसिद्ध होते, त्याला अकादमिक आणि वैचारिक बाजारात किंमत नाही; आणि एशियाटिकसारख्या संस्थेतच अशा विचारांची चिकित्सा होऊ शकते हे आडमार्गाने का होईना मान्य केल्याबद्दल सहस्रबुद्धे यांचे आभार! एका राजकीय पक्षाच्या सभासदांनी एकत्र सभासदत्व घेतले याचा उल्लेख करताना त्या सभासदांचा उल्लेख त्यांनी ‘खोगीरभरती’ असा केला आहे. संघपरिवाराशी संबंधित लोकांचे अर्ज खोर्‍याने आणि रेटून आणले गेले तर ते वाचनसंस्कृतीला उभारी देणारं ठरतं आणि एखाद्या बहुजनवादी पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना वाचण्यास प्रवृत्त केले तर ती खोगीरभरती होते, या भेदाभेदाला कशाचा वास येतो आणि त्याची मुळं कुठवर जातात हे सहज कळण्यासारखं आहे. मंत्रालयातून ज्यांनी अर्जांचे गठ्ठे आणले आणि सभासद नोंदणीसाठी दडपण आणले त्यांनी असा शहाजोगपणा करणं हे नवलच आहे. आमच्या पॅनलची चूक असलीच तर इतकीच आहे की, सहस्रबुद्धे आणि त्यांच्या बिनीच्या शिलेदारांप्रमाणे आम्ही चांगुलपणा सोडला नाही. सार्वजनिक जीवनात, विशेषत: २०१४ नंतरच्या नव्या स्वातंत्र्यात हा गुण दुर्मीळ असला तरी एशियाटिकसारख्या संस्थांचे भले हे सूत्र न सोडण्यातच आहे.

आमच्या पॅनलने मतदारांना जे आवाहन केले आहे, त्यात संस्थेचे आधुनिकीकरण आणि वारसा जतन करण्यासाठीच्या शिस्तबद्ध प्रयत्नांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. कुमार केतकरांनी विविध यूट्यूबर्सना दिलेल्या मुलाखतीतही हीच भूमिका तपशिलात मांडली आहे. ‘देशात नवविचार मांडण्यासाठी व्यासपीठे निर्माण झाली पाहिजेत. ‘एशियाटिक’ हे त्यातील एक महत्त्वाचे व्यासपीठ होऊ शकते. विविध विचारसरणींमध्ये वादविवाद निर्माण झाले तरच खरा भारतीय विचार अधिक मोठा होऊ शकतो. ‘एशियाटिक’ ही स्वायत्त संस्था आहे आणि तिचे स्वायत्त स्वरूप टिकवून ठेवण्यासाठीच आम्ही प्रयत्न करीत आहोत. ‘एशियाटिक’मध्ये विविध विचारांचा अभ्यास झाला पाहिजे, चर्चा झाल्या पाहिजेत. हाच विचार योग्य किंवा हा विचार अयोग्य असा निष्कर्ष त्यातून काढू नये. तर त्याबाबत झालेले मंथन लोकांसमोर ठेवायला हवे. लोक घ्यायचा तो बोध घेतील. इथे मोठमोठे शास्त्रज्ञ, संशोधक आले पाहिजेत. कलावंतांच्या इथे मैफली झाल्या पाहिजेत. कला, संस्कृती आणि साहित्य हे सगळे एकत्र येऊन त्याचा अभ्यास-संशोधन व्हायला हवे. कारण हा सगळा एका विशाल जागतिक संस्कृतीचा भाग आहे. संस्कृती ही कधीच स्थानिक नसते. ती एकूण जागतिक संस्कृतीचा भाग असते. आणि हीच संस्कृती टिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे.’ या भूमिकेत अस्पृश्यतेची कीड शोधण्यासाठी कोणतं कथन मनात रूजलेलं असावं लागतं हे सहज कळण्याजोगं आहे.

निवडणुकीचा प्रचार सुरू असताना सहस्रबुद्धे यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन एशियाटिकच्या विकासासाठी १०० कोटी मागितल्याचे आपल्या समाजमाध्यमांवरून फोटोसह जाहीर केले आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांचेच सरकार आहे, त्यामुळे त्यांना अशा भेटी घडवून आणणे सहज शक्य आहे. उद्या आमचे पॅनल निवडून आले तरी एशियाटिकच्या प्रेमापोटी हा निधी मिळावा यासाठी सहस्रबुद्धे आम्हांला सहकार्य करतील, असा मला विश्वास वाटतो.

एशियाटिकची निवडणूक म्हणजे मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, महाराष्ट्र साहित्य परिषद या निवडणुकांनंतरची संघपरिवार आणि त्यांच्या सत्तेला उदार आश्रय देणार्‍या महाकाय भांडवली सत्तेची लिटमस टेस्ट आहे. विनय सहस्त्रबुद्धे हे चांगले संघटक आहेत, त्यांनी म्हाळगी प्रबोधिनी उभारण्यात कष्ट घेतले आहेत. पण वर उल्लेख केलेल्या संस्था आणि एशियाटिक म्हणजे म्हाळगी प्रबोधिनी नव्हेत; किंबहुना या संस्थांचे ‘प्रबोधिनीकरण’ रोखणे हे सध्याचे सगळ्यात मोठे आव्हान आहे. सहस्त्रबुद्धे याला वैचारिक अस्पृश्यता म्हणतात, कारण ते त्यांना सोयीचे आहे. एशियाटिक जी काही जिवंत आहे, ती त्यातले प्रागतिकतेचे वारे बंद झालेले नाही म्हणून. सहस्त्रबुद्धे ज्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात ती देशभर सत्ता येण्याआधी भूमिगत आणि छद्म उदारमतवादी होती. आता पाशवी बहुमत आणि मोक्कार आर्थिक ताकद मिळाल्यावर त्यांनी आपले खरे रूप दाखवायला सुरूवात केली आहे. ते रूप एकरेषीय, साचेबद्ध आणि स्वातंत्र्याचा संकोच करणारे आहे. हा सांस्कृतिक फॅसिझमच आहे. व्यक्तिगत पातळीवर सहस्त्रबुद्धे आणि त्यांचे काही सहकारी प्रासंगिक उमदेपणा दाखवतीलही, पण तो त्यांच्या विचारसरणीच्या संस्थात्मक कार्यपद्धतीचा भाग नाही. त्यामुळे ‘एशियाटिक टुमॉरो’ या गोंडस नावाखाली ट्रिपल इंजिन सरकारच्या महाकाय यंत्रणेपुढे सरपटणारी संस्था असे एशियाटिकचे रूप त्यांच्या मनात आहे हे सांगायला (भारतीय ज्ञान(?) परंपरेत असली तरी) इथे ज्योतिषाची गरज नाही.

आमच्या पॅनलच्या उमेदवारांमध्ये पत्रकार, प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, चळवळीतले कार्यकर्ते, अभ्यासक अशा सर्वांचा समावेश आहे. सरकारच्या उघड-छुप्या पाठिंब्याने एशियाटिकवर ताबा मिळवण्याचे सर्व मार्गांनी प्रयत्न होत आहेत, हे लक्षात आल्यावर एकत्र आलेल्या लोकांनी हे पॅनल तयार केले आहे. पॅनेलमध्ये असलेले लोक अभ्यासू आहेत, त्यांनी निवडलेल्या विषयाबाबत ते चर्चा करतात, त्या विषयाची चिंता आणि चिंतन करतात हे महत्त्वाचे. ‘आपला देश बहुभाषिक, बहुसांस्कृतिक, बहुसामाजिक आहे. त्यामुळे विविध संस्कृती, विविध परंपरा यांच्यातील चांगल्या गोष्टींचे प्रतिबिंब आपल्या संस्थेत पडलेले दिसले पाहिजे. समतेचे विचार इथे आले पाहिजेत; पण अलीकडे समता म्हटले, की त्या माणसाला लोक ‘डावा’ म्हणतात. असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. कारण डॉ. आंबेडकर यांना समता महत्त्वाची वाटत होती, तशी विवेकानंदांनासुद्धा महत्त्वाची वाटत होती. त्यामुळे समग्र विचार देणारी ज्ञानसंस्था म्हणून ‘एशियाटिक’ पुढे यावी, हा आमचा आग्रह आहे.’आमच्या पॅनलमधल्या लोकांना एकूणात काय महत्त्वाचं वाटतं याचा हा सारांश आहे.

या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्तांपासून न्यायालयांपर्यंत सर्व यंत्रणा या टुमॉरोवादी मंडळींनी बेमुवर्तपणे वापरल्या. वर शहाजोगपणा करून ‘आम्हीच निवडणुका पुढे ढकलायला लावतोय’ असा कांगावा केला. तुमच्याकडे राजसत्ता वाकवण्याची इच्छा आणि शक्ती आहे, पण ते करताना या ऐतिहासिक संस्थेचा स्वायत्त अवकाश तुम्ही खणून काढलात याचीही इतिहासात नोंद होईल.

एशियाटिकची निवडणूक ४ जुलै रोजी होत आहे. निवडणूक चोखच लढायची असते आणि आम्ही ती लढणार आहोत. शहराचे पालकत्व ओरबाडून घेतलेल्या एखाद्या बांधकाम व्यावसायिकाकडून मतदारांना मतदानासाठी गाड्या पुरवण्याची आमची क्षमता नाही आणि इच्छाही. कारण, एकदा का हा बांधकाम व्यावसायिक फटीतून आत शिरला की इतर संस्था गिळंकृत करण्याचा त्याचा मनोदय जसा यशस्वी झाला तसाच इथेही होईल आणि हे ‘लोढणे’ कायमचेच एशियाटिकच्या गळ्यात येऊन पडेल. आमच्या दृष्टीने एशियाटिक म्हणजे रियल इस्टेट नव्हे. त्यामुळे आमचा मुखवटा आणि चेहरा दोन्हीही सारखा आहे, त्यात बकासुरी आर्थिक आकांक्षांना वाव नाही, हे नम्रपणे नोंदवावेसे वाटते.

निवडणुका निकोप वातावरणात झाल्या, त्यात सर्वांना मतदारांपर्यंत पोहोचण्याची समान संधी मिळाली, धाकदपटशा, आमीषे किंवा अशक्यप्राय आश्वासने देऊन त्यांचा कल फिरवण्याचे अश्लाघ्य प्रयत्न झाले नाहीत, तरच संस्थांमध्ये कार्यसातत्य राहते. आमची या प्रक्रियेच्या पावित्र्यावर भिस्त आहे. त्या आधारेच ‘सेव्ह एशियाटिक सोसायटी’ या नावाने कुमार केतकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनल निवडणुकीला सामोरे जात आहे. आम्ही सगळेच मूळचे वाचणारे लोक आहोत. त्याच हेतूने आम्ही वेळोवेळी एशियाटिकचे सभासद झालो. आमच्यातल्या काहींनी एशियाटिकला आकार देण्यात मोलाची भूमिका बजावली. ‘चला एशियाटिक ताब्यात घेऊन तिच्यावर आपल्या आणि आपल्याच विचारसरणीची नाममुद्रा उमटवू या’ या एककलमी कार्यक्रमाला अनुसरून या निवडणुकीचे राजकीय आखाड्यात रूपांतर करणार्‍यांसमोर आम्ही एक टीम म्हणून कृतिनिष्ठा आणि कामातला प्रामाणिकपणा या सामग्रीवर उभे आहोत. एशियाटिकच्या मतदारांच्या सामूहिक शहाणपणावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आमच्या संपूर्ण पॅनलला प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन करत आहोत.

(लेखक कुमार केतकर यांच्या नेतृत्वाखालील ‘सेव्ह एशियाटिक सोसायटी’ या पॅनलमध्ये उपाध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत.)

drdeepakpawarofficial@gmail.com