मुंबई : कला, संस्कृती व सामाजिक शास्त्राच्या संशोधन क्षेत्रात दोन शतकांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या दि एशियाटिक सोसायटीच्या मतदारांविषयीचा संभ्रम अजूनही कायम आहे. मतदान चार दिवसांवर येऊन ठेपले असले तरी मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरूच आहे. वर्गणी जमा केली, पण अपूर्ण अर्ज असलेल्या शेकडो अर्जदारांविषयी काय निर्णय घ्यायचा, यांविषयी संस्थेचे कार्यकारी मंडळ संभ्रमात असून मतदानाच्या दिवशी गोंधळ होण्याची शक्यता आहे.

१४ मार्च रोजी एशियाटिकची निवडणूक नियोजित आहे. पात्र सभासदांच्या संभ्रमामुळे यावेळच्या निवडणुकीचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला होता. त्यामुळे निवडणूक चार महिने पुढे ढकलण्यात आली होती. संस्थेने पात्र मतदारांच्या एकूण सात याद्या जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये ३१ मार्चपूर्वीचे २,३२१ आणि नंतरचे १,४१२ सभासद मतदानाला पात्र ठरले आहेत.

एशियाटिकच्या या निवडणुकीत राजकीय पक्ष उतरले आहेत. राजकीय पक्षांच्या कार्यालयातून मोठ्या संख्येने सभासदांचे अर्ज व वर्गणी भरण्यात आली आहे. अनेक सभासद अर्जांमध्ये अपुरी माहिती आहे. गेल्या २६ फेब्रुवारी रोजी संस्थेने प्रसिद्ध केलल्या पत्रकामध्ये २६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज व वर्गणी जमा केलेल्या अर्जदारांना मतदानाचा अधिकार देण्याचे जाहीर केले आहे.

या मतदानासाठी सभासद ओळखपत्र आवश्यक आहे. गेले तीन महिने पात्र सभासदांना ओळखपत्रे दिली जात आहेत. मात्र अपूर्ण अर्जदारांची ओळखपत्रे तयार नाहीत. अनेकांची सभासद वर्गणी राजकीय पक्षांच्या कार्यालयातून संस्थेच्या बँक खात्यामध्ये जमा झाली आहे. या अपूर्ण सभासद अर्जांचे करायचे काय, असा प्रश्न संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाला भेडसावतो आहे. त्यामुळे मतदानावेळी दक्षता म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

वर्गणी जमा केलेले पण अर्ज अपूर्ण असलेले अर्जदार मतदानाला आल्यास गोंधळाची स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात देखील मतदारांच्या याद्या तयार होत आहेत. अपूर्ण अर्जदारांना संस्थेकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र त्यांच्या अर्जात ई-मेल आणि दूरध्वनी क्रमांक नमूद नाहीत किंवा चुकीचे आहेत.

या संशोधन संस्थेच्या रिक्त जागांची निवडणूक वार्षिक सर्वसाधरण सभेत दरवर्षी होत असते. सरासरी दोनशेच्या आसपास मतदार मतदानाचा हक्क बजावतात. यावेळी राजकीय पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने हजारो मतदार मतदानास येण्याची शक्यता आहे.

केतकर विरुद्ध सहस्त्रबुद्धे लढत :

सोसायटीच्या १९ जागांसाठी १४ मार्च रोजी मतदान आहे. भाजप, मविआ (काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट) व अपक्ष असे तीन गट या निवडणुकीत उतरले असून 45 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे माजी राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य पत्रकार कुमार केतकर यांच्यात अध्यक्षपदासाठी दुरंगी लढत होत आहे.