मुंबई : कला व संस्कृतीच्या संशोधनाचा दोन शतकांचा वारसा असलेल्या दि एशियाटिक सोसायटीच्या १९ जागांसाठी शनिवारी (दि. १४ मार्च) निवडणूक होत आहे. निवडणूक दोन दिवसांवर असताना मतदार याद्या सदोष आहेत. अर्थतज्ज्ञ चिंतामणराव देशमुख, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले, नाट्य समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी, पत्रकार व युद्ध अभ्यासक दि. वि. गोखले यांसह अनेक नामांकित दिवंगत सभासदांची नावे मतदार यादीत असल्याने संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाविरोधात उमेदवारांकडून संताप व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे मतदार याद्यांतील गोंधळामुळे ही निवडणूक चार महिने पुढे ढकलण्यात आली होती. आता अद्ययावत मतदार याद्याही सदोष आहेत. एशियाटिक संस्थेकडून सात प्रकारांमध्ये सभासदत्व देण्यात येते. ३१ मार्चपर्यंतचे संस्थेचे २,३३८ सभासद होते. यामध्ये २,०९६ निवासी आजीव सभासद आहेत. या गटातील सभासदांच्या याद्यांमध्ये मोठा घोळ आहे. शेकडो सभासद निधन पावले असूनही त्यांना मतदानास पात्र ठरवण्यात आले आहे. या घोळामुळे संस्थेच्या अध्यक्षा प्रा. विस्पी बालापोरिया यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे.

‘एशियाटिक’ची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होती. मात्र मतदारांचा वाद प्रथम धर्मादाय आयुक्त आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात गेला होता. त्यानंतर सभासद छाननीचे काम बाह्यस्रोतांद्वारे पूर्ण करण्यात आले. संस्थेने अद्ययावत केलेल्या मतदार याद्या नुकत्याच संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामध्ये ३१ मार्चपूर्वीचे २३३८ आणि १ एप्रिलनंतरचे १४०९ सभासद मतदानास पात्र ठरले आहेत.

अंतिम मतदार यादीनंतरही आक्षेप कायम आहेत. यात शुल्क दिले पण यादीत नाव नाही. अर्ज व शुल्क भरले पण ओळखपत्र नाही. शुल्क जमा आहे पण अर्ज गहाळ आहे, अशा असंख्य तक्रारी आहेत. २६ नोव्हेंबरपर्यंत सभासद शुल्क भरलेल्यांनाच मतदानाचा अधिकार दिला. पण २४ ऑक्टोबरनंतर छाननी समितीची बैठक झाली नाही. त्यामुळे शेकडो अर्जदार मतदानास मुकणार आहेत.

सभासद प्रक्रियेत गोंधळ :

संस्थेतील सदस्यत्वाचा गोंधळ समोर आल्यानंतर उपाध्यक्ष डॉ. शहरनाझ नळवाला आणि बिप्लोव बेले यांची समिती नेमली. समितीने २० फेब्रुवारी रोजी संस्थेला अहवाल दिला. सभासदत्व देण्यासाठी संस्थेची निश्चित प्रक्रिया नाही. छाननी समितीने मंजूर केलेले अनेक अर्ज गहाळ आहेत. परस्पर सदस्यशुल्क भरले गेले आहे. एकाच खात्यातून शेकडोंचे शुल्क जमा झाले आहे. त्यामुळे सदस्यत्वाबाबतची नियमावली होईपर्यंत सभासद प्रक्रिया स्थगित ठेवण्याची शिफारस समितीने केली आहे.

हयात नसतानाही नाव :

माजी केंद्रीय अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले, ढवळे प्रकाशनगृहाचे बाळकृष्ण ढवळे, लेखक-समीक्षक स. ग. मालशे, विलास खोले, ‘बेस्ट’चे तत्कालीन जनसंपर्क अधिकारी ज. द. जोगळेकर, ‘नवाकाळ’चे संपादक निळकंठ खाडीलकर, संपादक पां. वा. गाडगीळ, पत्रकार व युद्ध अभ्यासक दि. वि. गोखले, चित्रपट समीक्षक रशिद इराणी, विज्ञान प्राध्यापक मोहन आपटे, कला-नाट्य समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी, इतिहासकार शारदा द्विवेदी अशी शेकडो निधन पावलेल्या नामवंतांची नावे शनिवारी होणाऱ्या मतदानास पात्र ठरवली आहेत.