प्राचीन इतिहास, कला व संस्कृतीच्या क्षेत्रात संशोधन कार्याचा दोनशे वर्षापेक्षा अधिक वारसा असलेल्या ‘दि एशियाटिक सोसायटी’च्या (मुंबई) निवडणुकीत भाजपने आपली शक्तीशाली निवडणूक यंत्रणा जुंपूनही शुक्रवारी पार पडलेल्या मतदानांमध्ये २५३० पैकी ५०८ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानात तिप्पट वाढ झाली असून यावेळच्या मतदानात नवमतदार बहुसंख्येने उतरल्याचे दिसले.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, भाजपच्या माजी आमदार भारती लव्हेकर, विधानपरिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्याचे लोकायुक्त न्या. विद्यासागर कानडे, प्रकाशक व लेखक रामदास भटकळ आदींनी मतदानाचा हक्क बजावला. दिवसभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा मतदानाला फटका बसला. सहस्त्रबुद्धे गटाकडून मतदारांची ने-आण करण्याची व्यवस्था होती. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या ‘लोढा फाऊंडेशन’च्या गाड्या त्यासाठी धावाधाव करत होत्या.

सहस्त्रबुद्धे आणि केतकर गटाचे मंडप शेजारी होते. भाजप व उजव्या गटातील संघटनांचे कार्यकर्ते सहस्त्रबुद्धे यांच्या केंद्रावर राबताना दिसत होते. तर केतकर गटाच्या मंडपामध्ये ज्येष्ठ लेखक, अभ्यासक, विचारवंत यांची प्रामुख्याने हजेरी होती. महानगरपालिका निवडणुकीप्रमाणे कार्यकर्ते येथे धावाधाव करत होते. ओळखपत्र नसतानाही मतदान करण्यास संमती दिल्याप्रकरणी केतकर गटाने आक्षेप घेतला. धर्मादाय आयुक्तांच्या देखरेखेखाली ही निवडणूक पार पडली. आयुक्त यांचे प्रतिनिधी के. डी. तळोकर हे निवडणूक निर्णय अधिकारी होते.

१९ जागांसाठी ही निवडणूक होती. मतदार याद्यांवरुन १० महिने लांबलेली निवडणूक दोनवेळा रद्द झाली होती. चार माजी खासदार या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने एशियाटिकच्या निवडणुकीत पहिल्यांदाच पक्षीय स्वरूप आले होते. अध्यक्षपदाचे उमेदवार कुमार केतकर आणि विनय सहस्त्रबुद्धे सकाळपासून आपापल्या बुथवर उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.

‘सेल्फी’साठी धडपड

चाणक्य मालिकेतील चंद्रप्रकाश द्विवेदी व महाभारत मालिकेतील कृष्णाच्या भूमिकेतील नितीश भारव्दाज हे माजी खासदार मतदान कक्षाच्या बाहेर दिवसभर उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधताना आणि सेल्फी घेताना तरुण सभासद मतदार दिसत होते. अनेक सभासदांना ओळपत्र असूनही मतदार यादीत नाव नसल्याने मतदान करता आले नाही.

आम्ही निवडणुकीची पद्धतशीर आखणी केलेली आहे. सभासदांशी संपर्क साधला आहे. आम्ही जिंकणार आहोत, याची पूर्ण खात्री आहे, असे ‘एशियाटिक टुमारो’ गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.

संघ परिवार ‘एशियाटीक’संस्थेवर कब्जा करु पहात आहे, म्हणून आपण या निवडणुकीत उतरलो आहोत. भाजपने ही निवडणूक पक्षीय पातळीवर नेली आहे, असे ‘सेव्ह एशियाटीक’ गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार कुमार केतकर म्हणाले.