मुंबई : एशियाटिक सोसायटीच्या शनिवारी होणाऱ्या बहुचर्चित निवडणुकीत राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी उमेदवार आहेत, मात्र पक्षीय राजकारण बाजुला ठेवून संस्थेच्या हितासाठी आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. कला, संस्कृती व इतिहासाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या या आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या संशोधन संस्थेचे राजकीयकरण करण्याचा आमचा कुठलाही इरादा नाही, असे ‘एशियाटिक टुमारो’ गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी स्पष्ट केले. मुंबई मराठी पत्रकार संघात ‘एशियाटिक टुमारो’ गटाने बुधवारी पत्रकार परिषद घेतली.

संस्थेच्या यावेळच्या निवडणुकीत उमेदवार व मतदारांमध्ये राजकीय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याचे ‘लोकसत्ता’ने वृत्त देऊन समोर आणले होते. संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाने निधीचा नियमबाह्य वापर केला आहे. दस्ताऐवजांचे वैज्ञानिक पद्धतीने जतन केले नाही. बेकायदा पद्धतीने सभासद वाढवण्यात आले. विद्यमान मतदार याद्या सदोष आहेत. नव्या सभासदांचे शुल्क शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून भरण्यात आले आहेत, असे संस्थेच्या विद्यमान व्यवस्थापन मंडळावर गंभीर आरोप डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी केले.

संस्थेची अकादमिक गुणवत्ता वृद्धीगंत करणे, संस्थेच्या कामाची व्याप्ती उपनगरांमध्ये नेणे, संस्थेचे काम लोकाभीमुख करणे, संस्थेच्या कामातील वैचारिक अस्पृश्यता संपवणे, संस्थेच्या आर्थिक शिस्तीची पुनर्रस्थापना करणे, संस्थेला खाजगी निधी उपलब्ध करुन देणे, राष्ट्र प्रथम धोरणातून कामकाज करणे या निर्धाराने आम्ही संस्थेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. सभासद मतदारांनी ‘एशियाटिक टुमारो’ गटाच्या सर्व १९ उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी केले.

एशियाटिकला वाचवा : कुमार केतकर

ऑक्सफर्ड, केंब्रिजच्या तोडीची एशियाटिक आज अडचणीत आहे. कवी, लेखक व संशोधकांनी येथे आले पाहिजे. जागतिक पातळीवरच्या चर्चा येथे होतील. संस्थेचा उदारमतवादाचा वारसा परत निर्माण केला जाईल. संस्थेची पुनर्रचना केली जाईल. येथे बौद्धीक वातावरण पुन्हा निर्माण करायचे आहे. एशियाटिकची वैचारिक संपन्नता वाढवून जगाला दिशा देणारी संस्था बनवायची आहे. त्यासाठी योग्य उमेदवारांची निवड करुन एशियाटिकला वाचवा… असे आवाहन काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य व अध्यक्षपदाचे उमेदवार कुमार केतकर यांनी केले आहे. या निवडणुकीत केतकर गटाचे १३ उमेदवार आहेत.

जागल्या म्हणून काम करणार : आर. व्यंकटेश

आम्ही कोणत्याही अध्यक्षांसोबत काम करू. एशियाटिक सर्वोच्च सांस्कृतिक आणि संशोधन संस्था करण्याचा आमचा प्रयत्न राहील. संशोधक, बँकर्स, संप्रेषण तज्ञ आणि उद्योजक या आमच्या कौशल्यांचा संस्थेसाठी वापर करू. संस्थेच्या कामांवर नियंत्रण ठेवणारे आम्ही ‘जागल्या’ असू. संस्थेसाठी निधी उभारण्यासाठी काम करू. त्यासाठी आमच्या ७ उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन अपक्ष गटाचे व्यवस्थापन मंडळाचे उमेदवार आर. व्यंकटेश यांनी केले आहे.