मुंबई : ‘नो युवर एशियाटिक’ (केवायए) हा तरुणांना आकर्षित करून घेणारा उपक्रम एशियाटिक सोसायटी तर्फे सुरू होत आहे. सोसायटीचे उपाध्यक्ष आणि अभिनेते डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या व्याख्यानाने सुरू होत असलेल्या या उपक्रमांतर्गत १५ ते ३० वयोगटातील युवकांना संस्थेचा इतिहास, ग्रंथ संपदा, दुर्मिळ दस्तावेज आणि वस्तू-संग्रह यांचा विनाशुल्क परिचय व्हावा यासाठी मार्गदर्शकासह एशियाटिकच्या दालनांना भेट देण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
यानिमित्ताने डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी ‘आर्य चाणक्यांची ज्ञान -परंपरा’ यावर आज भाषण होत आहे. या उपक्रमाच्या संचालक आणि मुंबई विद्यापीठातील पुरातत्वशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. प्राची मोघे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, या उपक्रमाच्या माध्यमातून एशियाटिक सोसायटीच्या पायऱ्यांवर येऊन सेल्फी घेणाऱ्या युवकांना या इमारतीच्या विविध दालनांना भेट देऊन आपल्या ऐतिहासिक वारशाची सखोल जाणीव करून घेता येईल.
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी दुपारी ३.३० ते ६.३० या कालावधीत हा उपक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये प्रारंभी अभ्यासक-चिंतकांच्या उपस्थितीत सह-वाचन, सह-चिंतन, नंतर संस्थेच्या दालनांना भेट आणि अनौपचारिक चहापान असा कार्यक्रम आखण्यात आला आहे. ‘थ्री चिअर्स फॉर थ्री अवर्स’ हे या उपक्रमाचे सूत्र वाक्य आहे. एशियाटिक सोसायटीचे सदस्य नसलेल्या नागरिकांना सुद्धा एशियाटिक च्या कामाचा जवळून परिचय व्हावा या साठी पूर्व-नोंदणी करणाऱ्या सर्वांनाच स-शुल्क भेटीची व्यवस्था आजही उपलब्ध आहे.
‘नो युवर एशियाटिक’च्या माध्यमातून दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी योजण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. एशियाटिक मध्ये संस्थेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापन समितीने कारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक नव्या उपक्रमांची रचना केली आहे. येत्या डिसेंबर महिन्यात संस्थेच्यावतीने ग्रंथ-संग्राहक आणि समीक्षक संमेलन ही योजले जाणार आहे.
