मुंबई : प्राच्यविद्या क्षेत्रातील संशोधनासाठी प्रख्यात असलेल्या एशियाटिक सोसायटीच्या व्यवस्थापन समितीच्या पाच जागांसाठी शनिवारी, २६ सप्टेंबर रोजी संस्थेच्या २२२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान मतदान होणार असून १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

संस्थेत सत्ताधारी असलेल्या ‘एशियाटिक टुमारो’ गटाने सर्व पाच जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यामध्ये सारंग दर्शने, डॉ. नील हेळेकर, अरविंद सिंग, डॉ. माधवी नरसाळे आणि विकास परांजपे यांचा समावेश आहे. बिप्लव बेलेल, नॉबी परियारम, संदिप दहिसरकर, शर्मिष्ठा मुखर्जी आणि योगेश शहा असे इतर पाच उमेदवार आहेत. ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता आहे.

शनिवारी सायंकाळी मतमोजणी होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप करंबेळकर यांनी सांगितले. जुलैमध्ये भाजपचे माजी राज्यसभा सदस्य डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील एशियाटिक टुमारो गटाबरोबर अटीतटीची निवडणूक लढवलेल्या काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांच्या ‘सेव्ह एशियाटिक’ गटाने या निवडणुकीतून अंग काढले आहे.

छाननी समितीच्या ७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. मात्र सात उमेदवाराचे अर्ज आल्याने अभिजित मुळ्ये, अमोल जाधव, दत्तात्रय पंचवाघ, मल्हार गोखले, उमंग काळे, अपर्णा सांभरे आणि हर्षदा सावरकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या पाच सदस्यांची दरवर्षी मुदत संपते आणि त्या रिक्त जागी सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये मतदानाद्वारे निवड केली जाते.

जुलैमध्ये पार पडलेली या संस्थेची निवडणूक मोठी वादग्रस्त ठरली होती. त्या निवडणुकीत ५१७ सभासदांनी मतदानात भाग घेतला होता. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी गेल्या ६० दिवसांत केलेल्या कामांचा लेखाजोखा समाज माध्यमावर प्रसिद्ध केला असून ‘एशियाटिक टुमारो’च्या पाच उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.