मुंबई : ब्रिटिशांनी ज्ञान व सत्ता एकत्र ठेवली, सत्ता वाचवण्याचे ज्ञानाला त्यांनी साधन बनवले. म्हणून इतिहासाची भारतीय दृष्टिकाेणातून मांडली केली पाहिजे. तरच प्रामाणिक व सत्य समोर यईल. भारतीयांच्या आवाजात भारतीय इतिहास लिहिणे आमचे धोरण आहे. त्यासाठी वसाहतीवादी ज्ञानातून मुक्ती मिळवण्याचे एशियाटिक सोसायटीसारख्या ज्ञानभांडार असलेल्या संस्थांनी ध्येय ठेवले पाहिजे, असा कानमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एशियाटिकच्या नव्या कार्यकारणीला दिला.
दोन महिन्यापूर्वी एशियाटिक संस्थेच्या निवडणुका झाल्या. भाजपचे माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली भाजप व उजव्या संघटनांच्या गटाने त्या जिंकल्या. नव्या कार्यकारणीने शहा यांना निमंत्रित केले होते. रविवारी शहा यांनी संस्थेला भेट दिली.
प्राच्यविद्या अभ्यासाचा पाया ब्रिटिशांनी घातला पण, ब्रह्मांडाचे कल्याण त्यांचे लक्ष्य नव्हते. आपली सत्ता टिकून ठेवणे हा त्यामागे एकमेव उद्देश होता. बाह्यशक्ती प्राच्यविद्येची परिभाषा करते तेव्हा त्यांचे हेतू स्वार्थी असतात. भारतीयांचा आत्मविश्वास संपवण्यासाठी ब्रिटिशांनी या ज्ञानाचा उपयोग केला. आज आपण स्वतंत्र आहोत. महान भारताची रचना करण्यासाठी या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. ज्ञानाला विचारधारेचे बंधन नसते. ज्ञानाचा दृष्टिकोण जरी बदलवला तरी ज्ञान उन्मुक्त राहते. म्हणून नालंदासारखी विद्यापीठे आक्रमकांनी जाळली तरी लोकांच्या स्मृती व कृतींनी भारतीय ज्ञानाचे सृजन हाेत राहिले, असे शहा म्हणाले.
जी राष्ट्रे आपला इतिहास, परंपरा, भाषा, संस्कार यांचे जतन करत नाहीत, ती शक्तीशाली असूनही नष्ट होण्यास वेळ लागत नाही. मात्र जी या ठेव्याचा सांभाळ करतात त्यांना अंकीत केले तरी ते गुलाम होत नाहीत. भारत त्याचे उदाहण असल्याचे ते म्हणाले. एशियाटिकमधील ज्ञानाच्या सागराचा विस्तार करा. संशोधकांना आकृष्ट करा, येथील ज्ञानाचा खजिना इलेक्ट्रानिक पद्धतीने खुला करा आणि भारतातील मोठ्या ग्रंथालयांचा आनलाईन मंच स्थापन करण्यात एशियाटिकने पुढाकार घ्यावा. राज्य आणि केंद्र सरकार एशियाटिकला आर्थिक बळ कमी पडून देणार नाही. केंद्रीय गृहमंत्री या नात्याने नव्हे तर भारतीय ज्ञानपरंपरा सहस्त्र वर्षे पुढे नेण्याच्या आंदोलनातील कार्यकर्ता म्हणून मी एशियाटिकमध्ये आलो आहे, असे शहा यांनी सांगितले.
एशियाटिकची लोकाभिमुकता कमी झाली होती, सत्ता परिवर्तन झाल्यामुळे एशियाटिकने माेकळा श्वास घेतला आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. अमित भाईंचे सस्थेला पाय लागल्याने आता काही कमी पडणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि एशियाटिकचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे व्यासपीठावर होते. राज्य सरकारचे अनेक मंत्री व भाजप पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले तर सचिव विवेक गणपुले यांनी आभार मानले. उद्योजक रमेश दंडवते यांनी संस्थेला पन्नास लाखाची मदत केल्याप्रकरणी त्यांचा सत्कार करण्यात आला.
पूर्ण इमारत मिळणार :
१. एशियाटिक इमारतीमध्ये असलेले राज्य शासनाचे मध्यवर्ती ग्रंथालय आणि मुद्रांक कार्यालय इतरत्र स्थलांतर करण्यात येईल. एशियाटिकने मागणी केल्यास मध्यवर्ती ग्रंथालयाातील सर्व ग्रंथसंपदा संस्थेला देण्याची सरकारची तयार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केली.
२. संस्थेतील दुर्मिळ पोथ्या आणि वस्तुंचे गणेश ज्ञानारती प्रदर्शनाचे उद् घाटन शहा यांनी केले. गौतम बुद्धांच्या भिक्षापात्रांचा अंश, सातवाहन- गुप्तकाळातील तेराशे नाणी, मुघलकालीन नकाशे यांची पाहणी त्यांनी केली.
