मुखपट्टीविना फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या मार्शलला मारहाण

पीडित पालिका क्लिन अप मार्शल चेंबूर येथील उर्मशी बाप्पा चौक येथे मुखपट्टीविना  फिरणाऱ्यांवर कारवाई करत होत्या.

corona-endemic
(प्रातिनिधीक छायाचित्र)
मुंबई : मुखपट्टीविना प्रवास करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणाऱ्या पालिका मार्शल महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करून विनयभंग करणाऱ्याविरोधात चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने हेल्मेटने केलेल्या मारहाणीत ही पालिका मार्शल जखमी झाली आहे. याप्रकरणी मोहसीम वसीम शेख (२७) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित पालिका क्लिन अप मार्शल चेंबूर येथील उर्मशी बाप्पा चौक येथे मुखपट्टीविना  फिरणाऱ्यांवर कारवाई करत होत्या. या वेळी आरोपी मोहसीम हा मुखपट्टीविना फिरताना आढळला. त्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या या मार्शलला मोहसीमने अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच त्यांना हेल्मेटने मारहाण केली. पोलिसांनी विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक पगारे यांनी दिली.

दरम्यान, जुहू येथेही मुखपट्टीविना फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पालिका मार्शलवर हल्ला झाल्याची घटना सोमवारी घडली. नाकाखाली मुखपट्टी परिधान करून फिरणाऱ्यांचे हा मार्शल छायाचित्र काढत होता. त्यामुळे छायाचित्र का काढले, असा जाब विचारून आरोपीने या मार्शलला मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून आरोपीला अटक केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Assault marshal action against man without mask akp