मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी जगभरात असलेले शिवकालीन साहित्य आणि वस्तूंचे सांस्कृतिक कार्य विभागातर्फे संकलन करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन सोहळय़ाच्या ३५० व्या वर्षांनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचा प्रारंभ गेट वे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले. आज पहिल्या दिवशी महानाटय़ : ‘जाणता राजा’चे सादरीकरण करण्यात आले.




छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आणि जगदंबा तलवार पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार वाघनखे दर्शनासाठी देण्याचे ब्रिटन सरकारने मान्य केले आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री मुनगंटीवार यांनी दिली.