राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत. देशमुखांना ईडीकडून अटक होऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. मात्र अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुख यांच्यावर टीका केली आहे.

“अनिल देशमुख यांना “प्रोटेक्शन फ्रॉम अ‍रेस्ट” देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मला खात्री आहे की ज्या क्षणी अनिल देशमुख “अज्ञातवास” मधून बाहेर येतील, त्या क्षणी सीबीआय आणि ईडी त्यांना अटक करतील,” असे भाकीत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे.

अनिल देशमुख यांना ED चे समन्स

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा हृषिकेश देशमुख यांना कथित मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशीसाठी नवीन समन्स जारी केले आहेत. त्यांना सोमवारी हजर राहण्यास सांगितले आहे.

सरकारी तपास यंत्रणा आता आपला दिवसेंदिवस अधिकच घट्ट करत आहेत. १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या १२ ठिकाणांवर नुकतीस छापेमारी केली गेली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, सांगली व अहमदनगर येथील ठिकाणांचा समावेश आहे. तर,अहमदनगर आणि मुंबईमध्ये डीसीपी राजू भुजबळ यांच्या घरी आणि पुणे, मुंबईत एसीपी संजय पाटील यांच्या निवासस्थानी छापेमारी करण्यात आली होती.

देशमुखांना दिलासा नाहीच!

भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे. देशमुखांवरील आरोपांची सीबीआयतर्फे चौकशी सुरू आहे. अशा वेळी न्यायालयाचा हस्तक्षेप हा सत्य उघड करण्यातील अडथळा ठरू शकतो. त्यामुळे सीबीआयला सत्य शोधण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने देशमुख यांची याचिका फेटाळताना स्पष्ट केले आहे.