मुंबई : अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर सध्या सुरू असलेल्या सवलतीच्या दरानेच आणखी गएक वर्षभर पथकर आकारणी करण्यास शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या सेतूवरून अपेक्षित वाहतूक होत नसून, टोलमध्ये वाढ केल्यास वाहनांची संख्या आणखी रोडावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) उभारण्यात आलेला हा २२ किमी लांबीचा प्रकल्प १३ जानेवारी २०२४ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मुंबई ते नवी मुंबई प्रवास केवळ १२ ते १५ मिनिटांत करणे शक्य झाले आहे. त्याच्या वापराकरिता ४ जानेवारी २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत सवलतीच्या दराने, कमीत कमी २५० रुपये पथकर आकारणीचा निर्णय घेण्यात आला होता.
पण भरमसाठ पथकर आणि वाशी पथकर नाक्यांवर हलक्या वाहनांना देण्यात आलेली पथकर माफी यामुळे अटल सेतूकडे वाहनांचा कल कमी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता आणखी एक वर्ष सवलतीच्या दरात टोल आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे.
