मुंबई : साकीनाका भागात महिलेवर अमानुष लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी रविवारी आरोपीवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारही (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेच्या मृत्यूनंतर शुक्रवारी पोलिसांनी या प्रकरणात बलात्काराच्या गुन्ह्यासह खुनाचे कलम समाविष्ट केले होते. त्यानंतर अ‍ॅट्रॅसिटीच्या कलमाचाही समावेश केला आहे.

साकीनाका  येथे शुक्रवारी पहाटे ३४ वर्षीय महिलेवर अमानुष लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. आरोपी मोहन चौहान याने पीडितेच्या गुप्तांगावर गंभीर जखमा केल्या होत्या. उपचारांदरम्यान पीडितेचे शनिवारी सकाळी राजावाडी रुग्णालयात निधन झाले. तिच्या मृतदेहाचे जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

दरम्यान, पीडितेच्या कुटुंबीयांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी रविवारी भेट घेतली. तसेच गुन्हा घडला त्या ठिकाणाचीही आयोगाने पाहणी केली. त्याचबरोबर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हालदार यांनीही पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली.