मुंबई : भिवंडीतून अनधिकृतपणे चालणाऱ्या टेलिफोन एक्स्चेंजवर राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कारवाई केली आहे. या कारवाईत ९ सिम बॉक्स, विविध कंपन्यांचे २४६ सिम कार्ड, ८ वायफाय राउटर सिमबॉक्स चालविण्याकरीता वापरण्यात येणारे १९१ अँटीनासह विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी अनधिकृत टेलीफोन एक्स्चेंज चालविणाऱ्या जाफर बाबूउस्मान पटेल (४०) याला एटीएसने अटक केली आहे. बेकायदेशीर सिमबॉक्सच्या सहाय्याने अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज चालवले जात असल्याची माहिती ३१ जुलै रोजी एटीएसला मिळाली. त्या गोपनीय माहितीच्या आधारे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी भिवंडीतील नवीन गौरीपाडा आणि रोशनबाग या ठिकाणी छापा टाकून अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचा शोध घेतला. कारवाई दरम्यान दिनस्टार कंपनीचे ९ सिम बॉक्स, विविध कंपन्यांचे २४६ सिम कार्ड, विविध कंपन्यांचे ८ वायफाय राउटर, सिमबॉक्स चालविण्याकरीता वापरण्यात येणारे १९१ अँटीना आणि सीमबॉक्स कायम कार्यान्वित रहावा यासाठी वापरण्यात येणारे इनव्हर्टर असा अंदाजे एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हेही वाचा - मुंबई : पोलीस ठाण्यातून आरोपीचा पळण्याचा प्रयत्न, पायाला दुखापत हेही वाचा - मुंबई : महागड्या दुचाकी चोरणाऱ्या सराईत आरोपीला अटक दीड वर्षापासून अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज सुरू होते. त्यामुळे भारत सरकारच्या दूरसंचार विभागाचे तीन कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तेथून आखाती देशात दूरध्वनी करण्यात आले आहेत. याप्रकरणी एटीएसने पटेल याला ताब्यात घेत चौकशीनंतर अटक केली. तो त्याच्या साथीदारांच्या मदतीने अनधिकृत टेलीफोन एक्स्चेंज चालवत होता. दहशतवाद विरोधी पथकाने त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३ (५) सह भारतीय टेलिग्राफ कायदा १८८५ मधील कलम ४, सह द टेलिकम्युनिकेशन अॅक्ट २०२३ चे कलम ४२ तसेच इंडियन वायरलेस टेलीग्राफी अॅक्ट १९३३ कलम ३ व ६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.