मुंबई : दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) संशयित दहशतवादी झाकीर हुसेन शेखच्या संपर्कात असलेल्या एका संशयिताला रविवारी मुंब्रा येथून अटक केली. रिझवान इब्राहिम मोमीन (४०) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून झाकीरच्या मोबाइल फोनची रिझवानने विल्हेवाट लावल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

रिझवान हा मुंब्रा येथील रहिवासी असून तेथे तो खासगी शिकवणी घेतो. तो झाकीरच्या संपर्कात होता. महिन्याभरापूर्वी झाकीर रिझवानच्या घरी दोन दिवस राहण्यासाठी गेला होता. त्यावेळी झाकीरने स्वत:च्या तसेच रिझवानच्या मोबाइलवरून पाकिस्तानातील त्याचा म्होरक्या अ‍ॅन्थोनी ऊर्फ अनस ऊर्फ अन्वरशी संपर्क साधल्याचा एटीएसला संशय आहे. झाकीरने रिझवानला त्याचा मोबाइल दिला होता. झाकीरच्या अटकेनंतर रिझवानने तो तोडून घराजवळील नाल्यातील वाहत्या पाण्यात फेकून दिला. रिझवानच्या चौकशीत मोबाइलबाबतची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. तो मोबाइल तीन तुकड्यांच्या स्वरूपात एटीएसला सापडला आहे. तो जप्त करण्यात आला असून पुढील तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.

देशात घातपाती कारवायांच्या तयारीत असलेला पाकिस्तानातील अ‍ॅन्थोनी याच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून झाकीर हुसेन शेख (५२) विरोधात एटीएसने लुक आऊट आदेश काढले होते. त्यानंतर शनिवारी याप्रकरणी झाकीरला अटक करून त्याच्याविरोधात बेकादेशीर कृत्ये (प्रतिबंधक) अधिनियम, १९६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी झाकीरच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रिझवानला अटक केली. त्याच्या मुंब्रा येथील घरी एटीएसने घेतलेल्या झडतीत संशयित दस्तऐवज सापडले असून ते जप्त करण्यात आले आहेत.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सहा संशयित दहशतवाद्यांना उत्तर भारतात विविध ठिकाणांहून अटक केली होती. हे दहशतवादी घातपाती कारवायांसाठी स्फोटके मागवण्याच्या तयारीत होते, असा संशय आहे. या सर्व कटामागे दाऊद टोळीचा अनिस इब्राहिम असल्याचा संशय आहे. अनिसचा विश्वासू हस्तक हा झाकीरचा नातेवाईक आहे. शेखला शुक्रवारी रात्री ताब्यात घेऊन एटीएसच्या नागपाडा येथील कार्यालयात आणून त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर शनिवारी त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, झाकीर व मोमीन दोघांनाही न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.