गेल्या साडेतीन महिन्यांत १९७ पोलिसांवर हल्ला; वाहतूक पोलीस सर्वाधिक लक्ष्य
समाजातील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांचा सर्वसामान्यांना नेहमीच धाक असतो. आपण काही गुन्हा केलेला नाही, असे माहीत असतानाही आसपास पोलीस दिसले की सर्वसामान्य माणूस धास्तावतो. खरं तर पोलीस हे नागरिकांचे मित्र असले पाहिजेत, अशी अपेक्षा असते. त्या अपेक्षेतून वरील चित्र विरोधाभासी वाटू शकते. पण त्याही पेक्षा गंभीर विरोधाभास म्हणजे, मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. गेल्या साडेतीन महिन्यांत १९७ पोलिसांवर हल्ला झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. यातही वाहतूक पोलीस अधिक लक्ष्य ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
शहराच्या गुन्हेगारीला, समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यापासून रस्त्यावर वाहतुकीचे नियमन करण्यापर्यंतच्या अनेक कामांत पोलीस आणि नागरिक यांचा थेट संबंध येत असतो. अशावेळी अनेकदा नागरिकांचे पोलिसांशी खटके उडतात, परंतु, खाकीवर हात उचलण्याची हिंमत सहसा कोणी करीत नाही. मात्र गेल्या काही काळात हे चित्र बदलताना दिसत आहे. मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी २०१६पासून एप्रिल मध्यापर्यंत पोलिसांवरील हल्ल्याच्या एकूण २०१ घटना घडल्या असून १९७ पोलिसांवर नागरिकांनी हात उगारल्याचे उघड झाले आहे. बुधवारीच विजय नांगरे या वाहतूक पोलिसाला दोन तरुणांनी शिवीगाळ केल्याचे उघड झाले तर गेल्या आठवडय़ात, ७ एप्रिल रोजी विलेपार्ले वाहतूक शाखेच्या एका हवालदारास वाकोला पुलाजवळ दोन जणांनी मारहाण केली होती.
नागरिकांशी संपर्क येत असल्याने अनेकदा विसंवादाचे प्रसंग येतात, परंतु, अनेकदा नागरिक आपल्यावर का कारवाई होतेय या विचाराने संतापतात आणि हल्ला करतात, असे एका वाहतूक पोलिसाने सांगितले. मद्यपान करून गाडी चालवण्याच्या तपासणीदरम्यान हा प्रकार अनेकदा दिसून येतो, तसेच वाहतूक नियमन करतानाही आपलेच वाहन का अडवले अशा कारणांवरूनही मारहाणीपर्यंत प्रकरण जाते, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींना दोन वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंड अथवा दोन्ही अशा शिक्षा होऊ शकतात,
धनंजय कुलकर्णी, पोलीस दलाचे प्रवक्ते, उपायुक्त (प्रकटीकरण)

आकडेवारी
जानेवारी ते १४ एप्रिल २०१६
* हल्ल्याच्या घटना – २०१
* घटनांमध्ये पोलिसांवर हात उगारला – १९७
* अटक आरोपी – १८८

विभागवार आकडेवारी
दक्षिण मुंबई प्रादेशिक – २४
मध्य मुंबई प्रादेशिक – ४४
पूर्व मुंबई प्रादेशिक – ७५
पश्चिम मुंबई प्रादेशिक – ५८
उत्तर मुंबई प्रादेशिक – ०