मुंबई : पश्चिम रेल्वेवरील मालाड रेल्वे स्थानकात लोकलमधून उतरत असताना झालेल्या वादातून एका ३३ वर्षीय प्राध्यापकावर हल्ला केला. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या हल्ल्यात प्राध्यापक आलोककुमार सिंग यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोर फरार झाला होता. बोरिवली रेल्वे पोलिसांनी संपूर्ण रात्रभर अथक परिश्रम करून आरोपी ओमकार एकनाथ शिंदे याला मालाडमधून पकडले.

रेल्वे पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपीला अटक करून गुन्हा उघडकीस आणला. तर, रेल्वे पोलिसांद्वारे पुढील कारवाई सुरू आहे. मालाड पूर्व येथे राहणारे आलोककुमार सिंग हे विलेपार्ले येथील एसव्हीकेएमचे नरसी मूनजी वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ते शनिवारी सायंकाळी ५.२५ वाजता अंधेरी रेल्वे स्थानक फलाट क्रमांक ३ वरून चर्चगेटवरून बोरिवलीकडे जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये बसले. लोकलमध्ये गर्दी असल्याने ते बोरिवली बाजूकडील डब्याच्या दरवाज्याच्या गर्दीत उभे राहून प्रवास करत होते. ही लोकल सायंकाळी ५.४० वाजता मालाड रेल्वे स्थानक फलाट क्रमांक १ वर थांबत असताना, आरोपी ओमकार एकनाथ शिंदे (२७) याच्याशी त्यांचा वाद झाला. लोकलमधून उतरण्यावरून वाद झाला. त्याचे रूपांतर भांडणात झाले. त्यावेळी शिंदे याने रागात त्याच्या जवळील तीक्ष्ण हत्यार आलोककुमार सिंग यांच्या पोटाच्या डाव्या बाजूत खुपसले. त्यात सिंग गंभीर जखमी झाले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

शिंदे घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेबाबत बोरिवली रेल्वे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. शिंदे याला पकडण्यासाठी बोरिवली रेल्वे पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. संपूर्ण तपास यंत्रणा हल्लेखोराच्या तपासात व्यस्त झाली. मालाड स्थानकातील सीसीटीव्ही चित्रिकरण तपासण्यात आले. संपूर्ण रात्रभर गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे मालाडमधील कुरार व्हिलेज येथे राहणारा संशयित व्यक्ती ओमकार शिंदे याला शनिवार मध्यरात्रीच्या सुमारास मालाड येथून ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याची सखोल चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

मालाड येथील घटनेच्या तपासासाठी आणि संशंयित हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी संपूर्ण रेल्वे पोलीस यंत्रणा कार्यरत होती. शनिवारी मध्यरात्री अथक परिश्रम घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आले. २४ तासांच्या आत आरोपीला पकडण्यात यश आले. – एम. राकेश कलासागर, लोहमार्ग पोलीस आयुक्त