आझाद मैदान परिसरात चोरट्यांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलीसावरच चोरट्यांनी हल्ला केला आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात एक पोलीस शिपाई जखमी झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
हेही वाचा >>>मुंबई विमानतळावर विमान उतरण्याआधीच इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न, प्रवासी पोलिसांच्या ताब्यात
रोहित विजय सिंह (२१), राम नायडू (२०), संजय वाघमारे (२१) व शाबीर शेख (१९) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या हल्ल्यात तुषार बाबूराव पवार हे जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पिंटुकुमार महेंद्र यादव (२६) हे टॅंकरचालक आहेत. नागरी संचालनालयाजवळ शनिवारी मध्यरात्री आरोपींनी चाकू आणि लोखंडी सळीचा धाक दाखवून दाखवला त्यांच्याकडे पाकिटाची मागणी केली. तक्रारदार यांनी पाकीट देण्यास नकार दिला असता आरोपींनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर यादव आरोपींच्या मागे धावत असता तेथे कर्तव्यावर असलेले पवार यांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पवार यांनाही धाक दाखवला. त्यानंतर रोहित सिंहने त्याच्या हातातील लाकडी बांबू पवार यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यामुळे पवार गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जवळच्याच खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांची स्थिती स्थीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना रविवारी पहाटे अटक करण्यात आली.