scorecardresearch

रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचून दोन कोटींचा विमा मिळवण्याचा प्रयत्न, तीन आरोपींना अटक

एलआयसीच्या अधिकाऱ्यांनी शिवाजी पार्क पोलिसांकडे केली तक्रार

insurance
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक फोटो, लोकसत्ता)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबईः रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचून दोन कोटी रुपयांचा विमा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना शिवाजी पार्क पोलिसांनी नुकतीच अटक केली. आरोपीने विमा कंपन्यांकडे सादर केलेल्या बनावट कागदपत्रात अधिक उत्पन्न दाखवले होते. त्याबदल्यात दोन विमा योजना घेतल्या होत्या. याप्रकरणी एलआयसीच्या अधिकाऱ्यांनी शिवाजी पार्क पोलिसांकडे तक्रार केली.

एलआयसीच्या दादर शाखेतील अधिकारी ओमप्रकाश साहू यांच्या तक्रारीवरून मंगळवारी पोलिसांनी बनावट कागदपत्र तयार करणे, फसवणूक, कट रचणे, फसवणुकीचा प्रयत्न आदी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच उपायुक्त (परिमंडळ-५) मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कसबे, पोलीस निरीक्षक केशवकुमार कसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश जमदाडे, उपनिरीक्षक योगेश राणे यांच्या पथकाने तपास करून दिनेश टाकसाळे, त्याचा मित्र अनिल भीमराव लटके व विजय रामदास माळवदे यांना अटक केली.

आणखी वाचा- विरार- बोळींजमधील म्हाडा वसाहतीतील पाण्याचा प्रश्न सुटणार; वसई-विरार महानगरपालिकेचे आश्वासन

आरोपी अभियांत्रिकी क्षेत्रात पदविकेचे शिक्षण घेतले असून ते अहमदनगरमधील रहिवासी आहेत. आरोपी दिनेशने २१ एप्रिल २०१५ रोजी एलआयसीकडे दोन कोटी रूपयांच्या विम्यासाठी अर्ज केला होता. त्याशिवाय त्याने साडेपाच कोटी रुपयांचा आणखी एक विमा काढला होता. त्यासाठी सादर केलेल्या बनावट कागदपत्रांमध्ये शेती व खानावळ यांच्या माध्यमातून वर्षाकाठी ३५ ते ४० लाख रुपये स्वतःची मिळकत दाखवली होती. त्यानंतर २५ डिसेंबर २०१६ रोजी रस्ते अपघातात गव्हाणवाडी, पुणे नगर रस्त्यावरील बेलवडी पोलीस ठाण्यात अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका तरूणाचा मृतदेह दिनेशचा असल्याचा दावा केला. त्यासाठी तेथील पोलिसांकडे आरोपीचे तोतया आई-वडील उभे करण्यात आले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून गाडीचे चाक गेल्यामुळे त्याची ओळख पटवणे शक्य नव्हते. त्याच्याच आधारे आरोपींनी तो दिनेशचाच मृतदेह असल्याचे सिद्ध केले.

आणखी वाचा- भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर आपत्कालीन स्थितीत समुद्रात उतरवण्यात आले

त्यानंतर त्याच माहितीच्या आधारे तोतया आई-वडिलांच्या माध्यमातून दोन्ही विम्याचे एकूण आठ कोटी रुपये मिळवण्याचा प्रयत्न केला. पण फक्त दोन कोटी रुपयांचा अर्ज स्वीकारण्यात आला. यावेळी दिनेशच्या खऱ्या आईने आपला मुलगा जीवंत असल्याचे सांगितले. तसेच दिनेशच्या वडिलांचा यापूर्वीच मृत्यू झाल्यामुळे दावा करण्यासाठी आलेले आई-वडील कोण? असा संशय विमा कंपनीला आला. याबाबत एलआयसीने केलेल्या तपासणीत दिनेश जिवंत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एलआयसीने याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीने दोन कोटी रुपयांची विम्याची रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यापूर्वीच एलआयसीच्या पथकाने या दाव्याची पडताळणी केली असता तो खोटा असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

मृतदेहाबाबत संशय

विम्याची रक्कम मिळवण्यासाठी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दिनेशचाच असल्याचा दावा करणाऱ्या आरोपींना या अपघाताबाबत माहिती कशी मिळाली? याबाबत पोलीस तपास करत आहेत. त्या मृतदेहाबाबत आरोपींना कोणी माहिती दिली? अथवा आरोपींनीच त्या व्यक्तीबाबत काही घातपात केला का याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 18:31 IST
ताज्या बातम्या