मुंबई: काेकण भवन येथील गटस्थापनेवेळी शिवसेनेच्या (ठाकरे) नगरसेविका सरिता म्हस्के या अनुपस्थित राहिल्याने त्या शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली. मात्र मी शिंदे गटाच्या संपर्कात नव्हते. शिंदे गटाच्या बड्या नेत्याने अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप म्हस्के यांनी केला. ‘त्यांना हुलकावणी देत तुळजापूरला नवस फेडण्यासाठी गेले. तिथे मोबाईल चालू ( रेंज ) नसल्याने मुंबईत काय चालू होते, याची मला कल्पना नव्हती. मात्र मुंबईतील गोंधळाची माहिती मिळाल्यानंतर मी मध्यरात्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या निवासस्थानी पोचले, ’ अशी माहिती म्हस्के यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

मुंबईत सत्तास्थापनेसाठी कोणात्याच पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही. महायुतीत भाजपकडे ८९ तर शिवसेना (शिंदे) यांच्याकडे २९ नगरसेवकांचे बहुमत आहे. दोघांचे मिळून ११८ नगरसेवक असले तरी शिवसेना (शिंदे) महापौरपदासाठी आग्रही आहे. अन्य पक्षातील नगरसेवक खेचून आपल्या नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न सर्वच महापालिकांत केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (ठाकरे) चांदिवली येथील प्रभाग क्र. १५७ च्या नगरसेविका सरिता म्हस्के या संपर्क क्षेत्राबाहेर गेल्याने त्या शिंदे गटात गेल्याची शंका व्यक्त केली जाऊ लागली. संपर्कात आल्यानंतर त्यांनीही शिंदे गटाच्या बड्या नेत्याने अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. यामुळे अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली पाठोपाठ मुंबई महापालिकेतही नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चांना बळ मिळाले.

याविषयी बोलताना सरिता म्हस्के म्हणाल्या, नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करण्यासाठी सोमवारी कोकण भवनमध्ये जायचे आहे, असा निरोप मिळाला होता. परंतु प्रत्यक्षात सोमवारी जाणे झाले नाही. त्यानंतर कोणताच संदेश आला नाही. या दरम्यान शिंदे गटाच्या बड्या नेत्याने पुन्हा त्यांच्या पक्षात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना हुलकावणी देत मी नवस फेडण्यासाठी तुळजापूरला गेले. निवडणुकीत विजय मिळण्यासाठी मी नवस केला होता. मुंबईत झालेल्या गोंधळाची माहिती मिळाल्यावर मिलिंद नार्वेकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. आळेफाट्याजवळील बेल्डा आणकुटी येथील म्हस्केवाडीतील देवाच्या पालखीलाही जायचे होते. मात्र मुंबईतील घडामोडींमुळे मी लगेच परतले.

उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

म्हस्के यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना आपण जिंकून आल्यानंतर विरोधकांकडून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. तरीही पक्षाला आमच्यावर विश्वास असून मी आजही शिवसेनेतच (उद्धव ठाकरे) असल्याचे सांगितले. आम्ही कुठे आहोत, हे कोणाला समजू नये आणि तुम्ही आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत मोबाईल बंद ठेवा, असा वरिष्ठांनी आदेश दिला होता. अजूनही मोबाईल सुरू करण्याची परवानगी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केेले. कोकण भवनमध्ये जाऊन नोंदणी केल्याचेही त्यांनी सांगितले.