संयुक्त महाराष्ट्र दालनात दिनू रणदिवे यांचा कार्यालेख उभारणीसाठी प्रयत्न 

प्रेस क्लबच्या वतीने आदरांजली

संग्रहित छायाचित्र

ज्येष्ठ पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक दिनू रणदिवे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदान जगासमोर यावे यासाठी संयुक्त महाराष्ट्र दालन येथे त्यांचा स्वतंत्र कार्यालेख उभारावा अशी इच्छा मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी प्रेस क्लबने आयोजित केलेल्या दिनू रणदिवे यांच्या शोकसभेत व्यक्त केली. यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे १६ जूनला निधन झाले. प्रेस क्लबने ऑनलाइन माध्यमातून शोकसभेचे आयोजन केले होते. ‘संयुक्त महाराष्ट्राची ठिणगी पेटवण्यात रणदिवे अग्रस्थानी होते. चळवळीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला. निर्भीड पत्रकारितेचा त्यांनी घालून दिलेला मापदंड आजही आदर्शवादी आहे. जीवनातील तत्त्व आणि लोहियावादी विचारसरणी त्यांनी शेवटपर्यंत जपली. अशा व्यक्तीच्या पश्चात त्यांचे कार्य अजरामर राहावे यासाठी सरकारने संयुक्त महाराष्ट्र दालन येथे त्यांचा कार्यालेख उभारावा.’ असा विचार मुणगेकर यांनी मांडला. त्यांच्या या विचाराचे सर्व ज्येष्ठ पत्रकारांकडून स्वागत झाले. तसेच इथून पुढची दहा वर्षे ‘दिनू रणदिवे सर्वोत्कृष्ट मराठी पत्रकार’ असा पुरस्कार प्रेस क्लबतर्फे देण्यात येणार असल्याचेही मुणगेकर यांनी जाहीर केले. या पुरस्काराची रक्कम २५ हजार इतकी असून पहिल्या वर्षीची रक्कम मुणगेकर स्वत: देणार आहेत.

रणदिवे यांची लेखणी समजासाठी बांधलेली होती. ते मराठी वृत्तपत्रात कार्यरत असले तरी संपूर्ण भारतात त्यांच्या कार्याची नोंद आहे. अशा भावना अनंत बागाईतकर यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या घरात कायम वर्तमानपत्रांची रद्दी पडलेली असायची. त्या राद्दीलाही चळवळीचा गंध असायचा. त्यातूनच अनेक तरुण पत्रकार घडले असे भास्कर सावंत यांनी सांगितले.

चौकटी बाहेरची पत्रकारिता..

रणदिवे यांनी चौकटीच्या बाहेर जाऊन पत्रकरिता केली. सिमेंट घोटाळ्याची बातमी, जॉर्ज फर्नाडिस यांच्या निवडणुकीच्या खटल्यात त्यांनी दिलेली साक्ष, समाजवादी चळवळ अशा विविध कार्यात त्यांना अनुभवता आले. एखाद्या बातमीची जबाबदारी घेत असताना त्यासाठी दिवसरात्र ते झटत होते. असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ यांनी केले.  ज्या काळात पत्रकारांवर अनेक बंधने होती. त्यांचे वैयक्तिक विचार बातमीपासून दूर ठेवले जायचे अशा काळात स्वत:ची भूमिका मांडत पत्रकारिता केली. दलितांपासून ते श्रामिकांपर्यंत प्रत्येकाला त्यांनी न्याय दिला, असेही ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Attempts to set up an office of dinu ranadive in the united maharashtra hall abn

ताज्या बातम्या