आमदार अतुल भातखळकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

एमएमआरडीएने कुरारमध्ये घरं तोडली असून, याविरुद्ध आवाज उठवला म्हणून अटक करण्यात आली असल्याची माहिती अतुल भातखळकर यांनी दिली.

atul bhatkhalkar arrested by police, aarey police station, MMRDA, uddhav thackeray
एमएमआरडीएने कुरारमध्ये घरं तोडली असून, याविरुद्ध आवाज उठवला म्हणून अटक करण्यात आली असल्याची माहिती अतुल भातखळकर यांनी दिली.

कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी परिसरातील घरांवर शनिवारी सकाळी कारवाई करण्यात आली. कारवाई सुरू झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांना याला विरोध केला. यावेळी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनीही घरांची पाडापाड सुरू असलेल्या ठिकाणी पोहचून कारवाईला विरोध सुरू केला. कारवाईला विरोध केल्याप्रकरणी भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी भातखळकर यांनीही ट्वीट करून माहिती दिली असून, ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

कुरार मेट्रो स्टेशनच्या कामामुळे बाधित होणाऱ्या मालाड पूर्व येथील सुमारे १५० रहिवाश्यांना मुंबई महानगरपालिकेनं घरे रिकामी करण्यासंदर्भात नोटीस दिल्या होत्या. त्यानंतर या घरांवर शनिवारी कारवाई करण्यात आली. याप्रकरणावरून अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली. ही घरे एमएमआरडीएकडून पाडण्यात येत असून, कारवाईला विरोध केल्याप्रकरणी अतुल भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अतुल भातखळकर यांनीही ट्वीट करून याची माहिती दिली आहे.

अतुल भातखळकर यांनीच ट्वीट करून माहिती दिली आहे. “ठाकरे सरकारच्या अत्याचाराचा कळस. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उद्घाटनाच्या चमकोगिरीसाठी कुरारमधील मराठी माणसांची घरे MMRDA ने तोडली. लोकांना प्रचंड मारहाण केली. या विरोधात आवाज बुलंद केल्याबद्दल मला अटक करून आरे पोलीस ठाण्यात नेत आहेत”, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

“मराठी माणसाचं नाव घेऊन पक्षाचं दुकान चालवायचं आणि ज्या मेट्रो प्रकल्पात अडचणींचे डोंगर उभे केले; त्या प्रकल्पातील एका स्थानकाच्या उद्घाटनासाठी लोकांना उद्ध्वस्त करायचे. त्यांचे आहे तिथे पुनर्वसन का नाही? गिरगाव पॅटर्न का नाही?”, असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.

“आयत्या पिठावर रेघोट्या आणि आयत्या बिळावर नागोबा… पैसे केंद्राचे, मेहनत देवेंद्र फडणवीस यांची आणि चमकोगिरी मेट्रोला कोलदांडा घालणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची. त्यासाठी पोलीस बळाचा वापर करून तोडली गेली मराठी माणसांची घरं”, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

गिरगाव येथील बाधितांना जागेच्या इतकीच जागा स्थानिक ठिकाणी देऊन पुनर्वसन करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना घेतला होता; त्याच धर्तीवर मालाड पूर्व येथील बाधितांचे सुद्धा पुनवर्सन झाले पाहिजे, अशी मागणी अतुल भातखळकर यांच्याकडून करण्यात आलेली आहे. “आम्ही आंदोलन करणारच आहे. उच्च न्यायालयाने कोविड काळात घरं तोडण्यास मनाई केलेली आहे, असं असतानाही पोलिसांनी बळजबरी करत कारवाई केली. याविरोधात आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Atul bhatkhalkar arrested by mumbai police aarey police station mmrda uddhav thackeray bmh

ताज्या बातम्या