लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : औरंगाबाद येथील २००६ सालच्या शस्त्रसाठ्याप्रकरणी गेल्या १९ वर्षांहून अधिक काळ अटकेत असलेला आरोपी मुस्तफा महमूद सय्यद याला मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. त्याच्याविरुद्धच्या खटल्याचे कमकुवत स्वरूप, खटला सुरू होण्यापूर्वीचा दीर्घ कारावास आणि खटल्याची संथ गती या बाबी न्यायालयाने मुस्तफाला जामीन मंजूर करताना प्रामुख्याने विचारात घेतल्या.
कबुलीजबाबात केवळ मुस्तफा याला निधी आणण्यासाठी बांगलादेशात पाठवल्याचा उल्लेख होता. त्याव्यतिरिक्त, त्याची कोणतीही सक्रिय भूमिका असल्याचे दिसून येत नाही, असे निरीक्षणही न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने
मुस्तफा याला जामीन मंजूर करताना नोंदवले. खटला चालवणाऱ्या न्यायालयाच्या परवानगीशिवाय महाराष्ट्र सोडून जाण्यास न्यायालयाने मुस्तफा याला मज्जाव केला असून, त्याला पारपत्र तपास अधिकाऱ्याकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
वीस वर्षांपूर्वी, ९ मे २००६ रोजी घटना उघडकीस आली होती. त्यावेळी राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जवळपास ७० – ८० किमी पाठलाग केल्यानंतर दोन चारचाकी वाहने अडवून १० एके-४७ रायफल्स, ४० मॅगझिन्स, २,००० जिवंत काडतुसे आणि सुमारे ३० किलो आरडीएक्स जप्त केले होते. अहमदनगरचा (अहिल्यानगर) चालक असलेल्या मुस्तफा याला ९ ऑक्टोबर २००७ रोजी अटक करण्यात आली होती. एका महिन्यानंतर, त्याने ‘माफीचा साक्षीदार’ होण्याची विनंती केली आणि गुन्ह्याबद्दलची सर्व माहिती उघड करण्याच्या अटीवर विशेष न्यायालयाने त्याला सशर्त माफी दिली.
म्हणून खटल्याला विलंब
अन्य २० आरोपींवर फेब्रुवारी २०१३ मध्ये आरोप निश्चित केले, तेव्हा माफीचा साक्षीदार असल्यामुळे त्याचा त्यात समावेश नव्हता. मात्र, त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याने माफीचा साक्षीदार म्हणून माघार घेण्याची आणि आपल्यावरही आरोप निश्चित करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. ती न्यायालयाने फेटाळून लावली. मुस्तफा याची मार्च २०१५ मध्ये माफीचा साक्षीदार म्हणून साक्ष नोंदवताना त्याने सरकारी पक्षाच्या बाजूने साक्ष दिली नाही. त्यामुळे त्याला फितूर घोषित केले गेले आणि त्याच्यावरील खटल्याची कार्यवाही इतर आरोपींपासून वेगळी ठेवली गेली. इतर आरोपींवरील खटला ऑगस्ट २०१६ मध्ये संपुष्टात येऊन १२ जणांना दोषी ठरवण्यात आले, तर आठ जणांची निर्दोष सुटका करण्यात आली. मात्र, हा खटला प्रलंबित असल्याने मुस्तफा कोठडीतच राहिला. त्यानंतर, २०२४ मध्ये मुस्तफा याने वकील मुबीन सोलकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली. मुस्तफावर चालवण्यात येणाऱ्या खटल्यात आतापर्यंत केवळ चार साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून सरकारी पक्षाकडून अद्यापही १०० साक्षीदारांची साक्ष नोंदवणे शिल्लक आहे. त्यामुळे, खटला लवकर संपण्याची शक्यता नाही, असा युक्तिवाद मुस्तफा याच्या वतीने करण्यात आला. शिवाय, अटक झाल्यापासून तो कोठडीत असल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले.
